अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे स्मारक उभारा; लोककलेचा वारसा जपण्याची मागणी; बोधेगावात अण्णाभाऊंच्या अस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 02:32 PM2020-08-30T14:32:20+5:302020-08-30T14:33:40+5:30
आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्मारक बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शासनाने उभारावे, अशी मागणी लोककलेच्या उपासकांनी केली आहे.
शेवगाव : आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्मारक बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शासनाने उभारावे, अशी मागणी लोककलेच्या उपासकांनी केली आहे.
अमर शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’मध्ये शनिवारी ‘अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ’ हे वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताचे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले. बोधेगावशी अण्णाभाऊ साठे व अमर शेख या दोघांच्याही स्मृती जडलेल्या आहेत. येथे शाहिरी विद्यापीठ निर्माण करण्याचे स्वप्न या दोघांनीही पाहिले होते. या विद्यापीठासंदर्भात अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतल्याचा उल्लेख शाहीर बाळ पाटस्कर यांच्या ‘चाक दांड्या’ आत्मचरित्रात आढळतो.
१८ जुलै १९६९ साली अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेले शाहीर अमर शेख यांनी १ आॅगस्ट १९६९ रोजी अण्णांच्या अस्थी बोधेगाव येथील शाहीरनगर येथील जमिनीत जतन केल्या आहेत. या दोनही लोकशाहिरांना अभिवादन करण्यासाठी शाहिरी विद्यापीठ उभारले जाणे आवश्यक आहे.
अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. त्या ठिकाणी अण्णांचे भव्य स्मारक व शाहिरी विद्यापीठ उभारण्याचा चंग अमर शेख यांच्यासह इतर शाहिरांनी बांधला होता. मात्र पुढच्याच महिन्यात अमर शेख यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे विषय मागे पडला.
बोधेगावच्या भूमीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख तसेच इतर शाहिरांचे वास्तव्य होते. त्यांनी समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. येथे अण्णाभाऊंचे स्मारक आणि शाहिरी विद्यापीठ उभारण्यासाठी मदत करू.
-नितीन काकडे, उपसरपंच, बोधेगाव
शासनाने बोधेगावातील जागेचा प्रश्न मार्गी लावावा. या पावन भूमीत शाहिरी कलाभवन व स्मारक उभारून अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांच्या स्मृती जतन कराव्यात. जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊंना हिच खरी आदरांजली ठरेल.
- अशोक शिंदे,अध्यक्ष, शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंच.
अमर शेख, अण्णाभाऊंच्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन पाठपुरावा करायला हवा. क्रांतीचे स्फुल्लींग पेटविणारी कला म्हणजे शाहिरी आहे. ही क्रांतीज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आणि शाहिरी कला जिवंत ठेवण्यासाठी या प्रश्नी शासनाने पुढाकार घ्यावा.
-अॅड. शिवाजीराव काकडे, शेवगाव.
शाहिरी विद्यापीठाबाबतचे ‘लोकमत’मधील वृत्त शनिवारी वाचले. वन क्लिक सिंड्रोमच्या जमान्यात अस्तंगत होत चाललेली कला जपण्याचा याहून मोठा मार्ग काय असू शकतो की त्या कलेचा अभ्यासक्रमात समावेश करणे. त्यानिमित्ताने एका मोठ्या ऐवजाचा धांडोळा जतन होईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक वारसा तयार होईल. हा नगरचा एक अर्थाने सन्मान आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे व अमरशेख यांच्या स्मृती बोधेगावच्या मातीशी जुळलेल्या असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी उचित पाऊल उचलणे आवश्यक आहे.
-मिलिंद शिंदे, अभिनेता