दोन अल्पवयीन मुलींचे साताऱ्याला पलायन; पोलिसांनी एकाच दिवसात घेतला शोध
By शिवाजी पवार | Published: August 3, 2023 03:18 PM2023-08-03T15:18:13+5:302023-08-03T15:18:18+5:30
श्रीरामपुरातून बेपत्ता, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांना तपासाचे आदेश दिले
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खंडाळा येथील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुलींना शोधण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. दोघी मुली खंडाळा (जि.सातारा) येथे मिळून आल्या. त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता दोन्ही अल्पवयीन मुली सायकलवर शाळेत गेल्या होत्या. मात्र संध्याकाळी साडे पाच वाजता शाळा सुटल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी शाळेत तसेच मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या पालकांनी मुलींना फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली होती.
पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांना तपासाचे आदेश दिले. दोन्ही मुली पुणे बसने गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पुणे बसस्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. त्यात मुली सातारा बसने गेल्याचे दिसून आले. बसच्या चालक व वाहकाकडे विचारणा केल्यानंतर खंडाळा येथे मुली उतरल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांना खंडाळा येथे दोन्ही मुली मिळून आल्या. त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना गावी आणण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत.