साईसंस्थान प्रसादालयात अन्नपूर्णा देवीची स्थापना संस्थानच्या अन्नछत्रातील अनेक वर्षांची उणीव दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:24+5:302021-05-16T04:19:24+5:30
अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात ...
अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात उभारलेल्या संस्थान प्रसादालयात रोज हजारो भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात़ दोन वर्षांपूर्वीच्या रामनवमीत एका दिवसात प्रसाद घेणाऱ्या भाविकांच्या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला़ कोविड रुग्णांसाठी तर सध्या हे प्रसादालय वरदान ठरत आहे.
शतकोत्तरी परंपरा असलेल्या संस्थानच्या या भोजन प्रसाद व्यवस्थेत अन्नपूर्णा देवीचे अधिष्ठान असावे, प्रसादालयात या मूर्तीची स्थापना करावी अशी अनेक भाविकांची इच्छा होती़ संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी प्रसादालयातील ही उणीव दूर केली आहे़ अक्षय तृतीयेच्या दिवशी सीईओ कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते प्रसादालयात अन्नपूर्णा देवीच्या संगमरवरी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़
संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, साई प्रसादालय विभाग प्रमुख विष्णू थोरात, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी, दिलीप सुलाखे आदींच्या उपस्थितीत हा विधी करण्यात आला़