खर्डा हत्याकांडाच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना, खासदार अमर साबळे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 08:03 PM2017-11-28T20:03:01+5:302017-11-28T20:24:25+5:30
खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे.
अहमदनगर : खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यापूर्वी या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती पोलीस तपास आणि न्यायालयीन तपास प्रक्रियेचा अभ्यास करणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साबळे म्हणाले, खर्डा हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने मी आगे कुटुंबीयांना भेट देऊन सात्वंन केले आहे. आम्ही प्राधान्याने आगे कुटुंबीयास पोलीस संरक्षण देणार आहोत. त्यानंतर आरोपींना शिक्षा होण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत. अॅट्रासिटीअंतर्गत कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सरकार हाताळणार आहे. तपासाअंतर्गत हलगर्जीपणा तसेच जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. चांगला वकील नेमून हे प्रकरण हाताळण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या अभ्यासासाठी समिती नेमण्यात येणार आहे़ शासनाचे निधी खाते, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व जिल्हा सरकारी वकील यांचा या समितीमध्ये समावेश असेल. ही समिती एफआयआर दाखल होण्यापासून निकालापर्यंतचा सखोल अभ्यास करेल. ही सर्व प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे. मुख्यंमत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मी आगे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणात शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची साबळे यांनी सांगितले.
रयतच्या संचालकांना कारवाई करण्यास सांगणार
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक समरसता व सत्याचे धडे या संस्थेमधून दिले जातात. मात्र खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतीलच कर्मचारी फितूर झाले. त्यामुळे संस्थाअंतर्गत त्यांची चौकशी करावी. या कर्मचा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या संचालकांकडे करणार असल्याचेही अमर साबळे यांनी सांगितले.