अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर उच्चाधिकार समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:10+5:302021-02-05T06:27:10+5:30
पारनेर : स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...
पारनेर : स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरणार असल्याचेही महाजन यांनी अण्णांना सांगितले.
तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारचे पत्र घेऊन राळेगणसिद्धीत येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्या बरोबर तासभर चर्चा करून सरकार बरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली.
बुधवारी केंद्रीय कृषिमंत्री तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली.
स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी या हजारे यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री तोमर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे महाजन यांनी अण्णांनी सांगितले. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरविण्यात येणार आहे. अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील याचा निर्णयही शुक्रवारी होणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन कृषिमंत्री व फडणवीस हजारे यांच्या भेटीला येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
...................
हजारे उपोषणावर ठाम
गुरुवारी भाजप नेते महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन उपोषणापासून परावृत्त होण्याची विनंती केली. तसेच अण्णांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही सांगितले. मात्र, या मागण्या जुन्याच आहेत. वारंवार लेखी देऊनही सरकारने त्यावर काहीच कार्यवाही न केल्याची खंत व्यक्त करीत हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले.