‘श्रीं’ची जल्लोषात स्थापना

By Admin | Published: August 29, 2014 11:36 PM2014-08-29T23:36:57+5:302014-08-29T23:39:17+5:30

आज अबालवृध्दांच्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले़ सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी अमाप उत्साहात ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना झाली़ यावेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता़

Establishment of Shri | ‘श्रीं’ची जल्लोषात स्थापना

‘श्रीं’ची जल्लोषात स्थापना

अहमदनगर : गणपती बाप्पा मोरया़़़़़मंगलमूर्ती मोरया़़़़़आले रे़़़आले गणराया आले चा जयघोष़ लेझीम अन् झांज पथकांची धूम़़़ढोल-ताशांचा निनाद आणि गुलालाची उधळण करत आज अबालवृध्दांच्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले़ सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी अमाप उत्साहात ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना झाली़ यावेळी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता़
गणेश चतुर्थीच्या आधी आठ दिवस सलग शहरासह जिल्ह्यात वरुणराजाने हजेरी लावल्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे़ शुक्रवारी सकाळी दहा वाजलेपासून गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली होती़ गणेशमूर्ती, फळे, फुले, डेकोरेशनच्या वस्तू, बाप्पांसाठी दागिने आदी खरेदीसाठी बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी झाली होती़ दुपारी दोन नंतर उपनगरासह शहरात ठिकठिकाणी बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली होती़
मिरवणुकीत लेझीम पथक, डोलीबाजा, झांज पथक आणि ढोल-ताशांचा गजर घुमला़ मोठ्या गणेश मंडळांसह बालगोपाळांच्या मंडळांनीही दुचाकी, हातगाडी व रिक्षातून मोठ्या उत्साहात बाप्पांची मिरवणूक काढली होती़ सकाळी ९ ते १ तर दुपारी तीनपर्यंत श्रींच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त होता़ दुपारी ३ पर्यंत घरोघरी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली़ (प्रतिनिधी)
गणेश मूर्तींची विक्रमी विक्री
शुक्रवारी श्रींच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी उपनगरासह शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रींचे स्टॉल लागले होते. छोट्या-मोठ्या गणेश मंडळांसह घरगुती गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींची खरेदी करण्यात आली. दुपारी तीननंतर व्यावसायिकांनी मूर्तींचे दर कमी केले होते.
सोशल मीडियावर बाप्पांचे स्वागत
गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर बाप्पांचेच अधिराज्य आहे. आकर्षक गणेश मूर्ती, देखावे, मखर यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. या बाप्पांच्या पोस्टला मोठ्या संख्येने लाइक मिळत आहेत.
आकर्षक देखावे
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा प्रथमच विविध गणेश मंडळांच्यावतीने थ्री डी देखाव्यांचे सादरीकरण होणार आहे़ यामध्ये स्त्री भ्रूणहत्या, सूर्यपुत्र शनिदेव, रावण वध, संत ज्ञानेश्वरांची भिंत चालविली यासह प्रबोधनात्मक देखावे थ्रीडीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत़
पोलीस बंदोबस्तात वाढ
यंदाच्या गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची झालर आहे़ एरव्ही मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करणाऱ्या इच्छुकांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन युवक कार्यकर्ते जोडण्याची नामी संधी मिळाली आहे़ त्यात आचारसंहिताही लांबणीवर गेली आहे़ त्यामुळे इच्छुकांकडून गणेशोत्सवात शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे़ त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत़

Web Title: Establishment of Shri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.