तेरा शेतकरी कंपन्यांची स्थापना
By Admin | Published: September 10, 2014 11:35 PM2014-09-10T23:35:31+5:302023-10-30T11:04:21+5:30
अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली
अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एम़ए़एस़पी़ प्रकल्पातून सुमारे ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले व उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली़
जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करावयाची होती़ त्यापैकी पाच कंपन्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित आठ कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या कंपन्यांच्या माध्यमातून विविध शेतमालावर प्रक्रिया आणि उत्पादन करण्यात येणार आहे़ शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही एक्स्पोर्ट करण्यावर प्राधान्य राहणार आहे़
शेतकरी कंपनीसाठी आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते़ या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे़ त्यासाठी जागतिक बँकेकडून एका कंपनीस साडेसात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, उर्वरित भागभांडवल शेतकऱ्यांना उभे करायचे आहे़
कंपनी स्थापनेमुळे शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ होणार आहे़
(प्रतिनिधी)
राहात्यात पहिली महिला कंपनी
राहाता परिसरात महिलांची शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येत आहे़ या कंपनीच्या क्षमताबांधणीचे काम पूर्णत्वाकडे असून, महिलांची ही कंपनी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ठरणार आहे़
त्यामुळे महिलाही प्रक्रिया आणि उत्पादक होणार असून, कंपनीच्या मालक होणार आहेत़
या आहेत १३ कंपन्या
राहाता ग्रामोद्योग (राहाता), अमरसिंह (कर्जत), फार्मसीस (पारनेर), दत्तकृपा (शेवगाव), गर्भगिरी (वांबोरी, ता़ राहुरी) या पाच कंपन्यांची नोंदणी कंपनीअॅक्ट कायद्यानुसार पूर्ण झाली आहे़ तर आदर्श उत्पादक कंपनी (पिंप्री लौकी), माऊली शेतकरी उत्पादक संघ (श्रीगोंदा), ज्ञानदीप उत्पादक संघ (कुकाणा), पुण्यस्तंभ उत्पादक संघ (पुणतांबा), जाणता राजा उत्पादक संघ (टाकळीभान), आदर्श साई माऊली उत्पादक संघ (दहिगाव बोलका), साकुर पठार उत्पादक संघ (साकुर), साई प्रवरा उत्पादक संघ (कोल्हार) या आठ उत्पादक शेतकरी कंपन्याची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे़
‘गर्भगिरी’ची भरारी
वांबोरी येथील गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनीने अन्नधान्य व बीजप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे़ या प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मशिनरीसाठी ७ लाख व युनिट बांधकामासाठी १५ लाख खर्च अपेक्षित आहे़ या कंपनीची खरीप हंगामात २१ लाख ६० हजारांची उलाढाल झाली असून, सुमारे ६ कोटी रुपयांचा कांदा उत्पादीत करणार आहे़ गंगाधर चिंधे यांनी कंपनीसाठी जमीन दिली आहे़