नैतिकता हा संशोधनाचा आत्मा आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:25 AM2021-08-25T04:25:58+5:302021-08-25T04:25:58+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ‘संशोधनात मोजमाप, नैतिकता आणि बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर तीनदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ‘संशोधनात मोजमाप, नैतिकता आणि बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर तीनदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. समारोपावेळी सोमवारी (दि.२३) डॉ. उमराणी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी होते. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार यावेळी उपस्थित होते.
संशोधन हे केवळ पदवीसाठी न होता देशाला पुढे घेऊन जाणारे असावे. संशोधनाची गोडी विद्यार्थ्यांना लागली पाहिजे. शिक्षण-संशोधनाची योग्य शृंखला जोडल्यास आपण अनेक समस्यांवर मात करू शकतो. आज देशात अनेक विषयांवर संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आपल्यासमोर ई-कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यावर मात करायची असेल, तर नवीन तंत्रज्ञानावर आधारित संशोधन झाले पाहिजे. कोणत्याही विषयातील संशोधनात नैतिकता महत्त्वाची असते, असेही डॉ. उमराणी म्हणाले.
प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी तीनदिवसीय कार्यक्रमाविषयी आढावा घेतला. पहिल्या दिवशीचे संशोधक व्याख्याते डॉ. राजेंद्र कुंभार यांनी संशोधनाविषयीच्या आचारसंहितेची मांडणी केली. दुसऱ्या दिवशी डॉ. हेमंत चांडक यांनी संशोधनाच्या मोजमापचे नियंत्रण याविषयी विश्लेषण केले. तिसऱ्या दिवशी प्रा. सौरभ उबाळे यांनी ‘बौद्धिक संपदा अधिकार’ याविषयी विस्तृत माहिती दिली. आयोजनासाठी समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे, ग्रंथपाल डॉ. बी.व्ही. चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले केले. मराठी विभागप्रमुख डॉ. अशोक लिंबेकर, वाणिज्य विभागातील प्रा. सारिका पेरणे आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश्वरी ओझा, डॉ. बी.एम पालवे यांनी केले. प्रा. श्रीहरी पिंगळे, प्रा. डॉ. बापूसाहेब शिंगाडे यांनी आभार मानले.