तक्रार देऊनही काहीच झाले नाही, मग महिलांनीच जाळला अवैध दारूचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:15 AM2024-12-02T08:15:53+5:302024-12-02T08:16:11+5:30
आमच्या कुटुंबातील कर्ता गेल्याचे दुःख; इतरांवर अशी वेळ येऊ नये
बेलापूर (जि. अहिल्यानगर) : श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पट्ट्यातील रामपूरवाडी-कोकरे येथे आक्रमक महिलांनी अवैध दारूचा अड्डा जाळला. यावेळी रामपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये अवैध दारू विकी सुरू हाेती. हे लक्षात येताच महिलांनी आपला माेर्चा त्या दुकानाकडे वळवला. दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. ही घटना रविवारी (दि.१) सकाळी घडली. महिलांनी केलेल्या या धडक कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.
रामपूर-कोकरे येथील महिलांनी अचानक अवैध दारू धंद्याविरोधात हत्यार उपसल्याने गोदावरी पट्ट्यातील महिलांचा रुद्रावतार दिसून आला. संतप्त महिलांनी दारूचा अड्डा पेटवून देत दारूच्या बाटल्या फोडल्या.
दारूच्या व्यसनामुळे आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने मी रोजंदारी करून लहान मूल आणि वृद्ध व्यक्तीचा सांभाळ करते. यापूर्वी गावात अवैध दारूची दुकाने होती. ती बंद झाल्याने आता गावाच्या शेजारी अनेकांनी अवैध दारूची दुकाने थाटली. यामुळे आबालवृद्धांसह मुले देखील व्यसनाधीन होत आहेत. आमच्या कुटुंबातील कर्ता गेल्याचे दुःख आहे. इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये. अवैध दारू विक्री कायमची बंद करावी.
- रेखा जाधव, आंदोलक महिला