पाऊस परतला तरीही जनावरांना छावणीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 04:05 PM2019-07-21T16:05:31+5:302019-07-21T16:05:38+5:30
पावसाळ्याच्या सुरूवातीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यावर्षी चांगला पाऊस पडेल म्हणून चार महिन्यांपासून छावणीत असलेली जनावरे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एका दिवसात छावणीतून घरच्या दावणीला नेऊन बांधली.
अशोक मोरे
करंजी : पावसाळ्याच्या सुरूवातीस काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. यावर्षी चांगला पाऊस पडेल म्हणून चार महिन्यांपासून छावणीत असलेली जनावरे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने एका दिवसात छावणीतून घरच्या दावणीला नेऊन बांधली. काही गावातील छावण्या तर जनावराअभावी बंद पडल्या, तर काही छावण्या चालूच होत्या. पावसाळ्याचा दिड महिना होऊन गेला तरी पाऊसच न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या दावणीची जनावरे परत छावणीच्या प्रतीक्षेत आहेत.
करंजी परिसरातील घाटसिरस, सातवड, निंबोडी, दगडवाडी येथील छावण्यातील जनावरे शेतकºयांनी थोडासा पाऊस पडताच घरी नेली. त्यामुळे छावण्या बंद झाल्या. तर काही छावणीचालक छावणी बंद करण्याच्या तयारीत होते. मात्र पाऊस झाला तरी महिनाभर जनावरांना परिसरात चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांच्या मागणीमुळे काही छावण्या चालूच होत्या. पावसाळ्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.
त्यानंतर पावसाळ्याचे दोन महिने होत आले तरी या भागात पाऊस फिरकला नाही.
जनावरांच्या चाºयाची व पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र झाली. पाऊस लांबल्याने पशुधन पुन्हा संकटात सापडले. बंद करण्यात आलेल्या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात, किंवा बंद झालेल्या छावण्यांमधील जनावरे इतर छावण्यात समाविष्ट करण्याची त्रिभुवनवाडी, निंबोडी, दगडवाडी, घाटसिरस, सातवड या भागातील शेतकरी मागणी करीत आहेत. करंजी, भोसे (काराचा माथा), जोहारवाडी, लोहसर, राघु हिवरे, कौडगाव, वैजुबाभुळगाव या गावातील छावण्या मात्र सुरू आहेत.
जनावरे घरी नेल्याने दगडवाडीची छावणी बंद करण्यात आली होती. शेतकºयांच्या मागणीमुळे येथील छावणी पुन्हा चालू करण्यात आली. - स्वाती शिंदे, सरपंच, दगडवाडी
या भागातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मागणीनुसार या भागातील बंद छावण्यांना त्वरित परवानगी देण्यात येणार आहे. तसेच सुरु असलेल्या छावण्यांमध्ये जनावरे समाविष्ट करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - नामदेव पाटील, तहसीलदार, पाथर्डी