दहा दिवस उलटूनही शेतातील पिके पाण्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:00 PM2019-11-10T13:00:04+5:302019-11-10T13:00:22+5:30
मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.
सचिन नन्नवरे ।
मिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मिरी, आडगाव परिसरातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले कापसू, कांदा पिके सडले आहे, तर बाजरी, मक्याला कोंब फुटले आहेत.
मागील वर्षी या भागात पावसाने दडी मारली. यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल अशी भीती होती. त्यातच अधूनमधून पडलेल्या पावसावर शेतकºयांनी बाजरी, कापूस व कांद्यासारखी पिके घेतली होती. ही सर्व पिके काढणीला आली होती. त्यातच या भागात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतात तळे साचून शेतात उभे असलेले पीक पूर्णपणे चिखलमय होऊन सडून गेले आहे. त्यामुळे शेतात पाउलही ठेवता येत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक आपल्या डोळ्यादेखत सडताना पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.
शेतकºयांनी मळणीसाठी जमा करून ठेवलेल्या बाजरीच्या कणसाला तर अक्षरश: कोंब फुटले. उभे असलेले बाजरीचे पीक सडले आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी तयार असलेला चांगल्या दर्जाचा कांदाही शेतातच राहून सडल्याने भाव असूनही शेतकºयांच्या पदरात मात्र निराशाच पडली आहे. कापूसही ऐन वेचणीच्या काळात असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्व कापूस काळवंडला आहे. या सर्व पिकांसह जनावरांसाठी उत्तर चारा म्हणून उपयोगात येणारे मका, ज्वारीचे पीकही पूर्णपणे वाया गेले आहे.
या पिकांसह काही फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे एक तर पिकेही गेली व आर्थिक नुकसानही झाल्याने आता निदान शासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करावी, विमा कंपनीनेही शंभर टक्के सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी लक्ष्मण लोंढे, संजय भानगुडे, दिलीप मुनोत, ललित मुनोत, भाऊसाहेब पाचरणे, जनार्दन वाघमोडे, भाऊसाहेब कांबळे, विक्रम वाघ आदींसह आडगाव, मिरी, रेणुकाईवाडी, शिराळ, शिंगवे केशव आदी शेतकºयांनी केली आहे.
अवेळी व अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे केले. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी व विमा कंपनीकडूनही पीक विमा मंजूर व्हावा यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलून पाठपुरावा केला जात आहे, असे पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी सांगितले.
सावकारी कर्ज काढून पिकांची लागवड केली. सर्व कुटुंबाने मेहनत करून पिके जगवली होती. परंतु, दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शासनाने आम्हाला आर्थिक मदत करून विमाही मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी लक्ष्मण लोंढे यांनी केली आहे.
कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे कळाल्याने शेतात असलेला कांदा काढणीची तयारी केली होती. परंतु, काढणीच्या आधीच अतिवृष्टी झाल्याने शेतातील कांदा शेतातच सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी विक्रम वाघ यांनी सांगितले.