दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:44 PM2019-06-02T12:44:20+5:302019-06-02T12:44:24+5:30

दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

Even before the passage of Class X, Polytechnic access was already started | दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

विनोद गोळे
पारनेर : दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच तंत्रनिकेतनसाठी अर्ज भरावे लागणार आहेत. यातून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षण शाखेकडे जाण्याचा कल वाढून तंत्रनिकेतन महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे़
राज्यात दहावीनंतर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, अ‍ॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनसह इतर विभागांचा समावेश असतो़ अकरावी, बारावीनंतर अभियांत्रिकीला जाण्याऐवजी दहावीनंतरच तीन वर्षे तंत्रशिक्षण घेण्याच्या या पॅटर्नकडे दरवर्षीच्या उशिरा प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थीसंख्या काही प्रमाणात रोडावली होती़ यामुळे राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालये अडचणीत आली होती.

गुणपत्रिका थेट तंत्र शिक्षण विभाग घेणार
दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाआधीच तंत्रनिकेतन महाविद्यालयात ३० मे ते १८ जून दरम्यान आॅनलाईन नोंदणी करायची आहे़ यात विद्यार्थी कोणत्या तालुक्यातील, कोणत्या शाळेतून दहावीत शिक्षण घेतले?, ही माहिती तंत्र शिक्षण विभागाकडे राहणार आहे़ विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल लागल्यावर तंत्र शिक्षण विभाग थेट संबंधित विद्यार्थ्याचा निकाल महाराष्ट राज्य परीक्षा मंडळाकडून घेऊन लगेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांची गुणवत्ता यादी तयार करण्याची नवी पद्धत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ़ अभय वाघ यांच्या संकल्पनेतून साकारली जाणार आहे़

राज्यात दरवर्षी २६ जूननंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू होते़ मात्र त्यात विद्यार्थी व संस्थांचे मोठे नुकसान होत होते़ त्यामुळे आम्ही यावर्षीपासून तंत्रशिक्षणाची प्रकिया महिनाभर आधीच सुरू केली आहे. तीस मे ते अठरा जूनपर्यंत नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे सुरू करावी़ यात विद्यार्थ्यांची शाळेची व इतर माहिती घेतली जाणार आहे़ यातून विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे़ लगेच निकालपत्रक देण्याची गरज नाही़ - डॉ़अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई.

दहावीच्या निकालानंतर धावपळ होण्यापेक्षा आधीच विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेशिवाय सुरू केलेली तंत्रनिकेतनची प्रवेशप्रक्रिया चांगली आहे़ -योगिता फापाळे, विद्यार्थिनी, तंत्रशिक्षण विद्यालय, अवसरी

Web Title: Even before the passage of Class X, Polytechnic access was already started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.