मुलगा परीक्षार्थी असतानाही ‘एमडी’ निवड मंडळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:26 AM2017-10-30T03:26:43+5:302017-10-30T03:27:26+5:30
जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षार्थी आहे. मात्र त्यानंतरही वर्पे हे स्वत: निवड प्रक्रियेत सक्रीय आहेत.
सुधीर लंके
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षार्थी आहे. मात्र त्यानंतरही वर्पे हे स्वत: निवड प्रक्रियेत सक्रीय आहेत. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या लेखनिक, कनिष्ठ अधिकारी, द्वितीय व प्रथम श्रेणी अधिकारी अशा एकूण ४६४ जागांसाठी भरती आहे. बँकेने शनिवारी निवड यादी जाहीर केली. मुलाखतींसाठी नियुक्त केलेल्या समितीचे वर्पे हे सचिव होते. सर्वसाधारणपणे पदाधिकारी व अधिकारी यांच्या जवळचे उमेदवार परीक्षा देणार असतील तर संबंधितांनी प्रक्रियेपासून दूर रहावे, असा संकेत आहे.
बँकेच्या स्टाफिंग पॅटर्ननुसार (सेवकमांड) भरती प्रक्रिया राबवली जाते. ‘लोकमत’ने बँकेकडे अनेकदा त्याची मागणी केली. मात्र, ही प्रत उपलब्ध करुन दिलेली नाही. नाशिक येथील विभागीय सहनिबंधकही ही प्रत देण्यास टाळटाळ करत आहेत. बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी भरती प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शकपणे झाल्याचा दावा केला आहे.