साठेआठ कोटींचा निधी तरी रखडला रस्ता; नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
By अरुण वाघमोडे | Published: May 3, 2023 02:06 PM2023-05-03T14:06:56+5:302023-05-03T14:07:14+5:30
प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अरुण वाघमोडे, अहमदनगर: साठेआठ कोटी रुपयांचा निधी दोन वर्षांपासून मंजूर असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शहरातील सर्वांधिक वर्दळीचा समजला जाणारा काटवन खंडोबा रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. ८ मे रोजी कामाची निविदा उघडली जाणार असून त्यानंतर सात दिवसांत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येतील, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात के.डी खानदेशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवाजीराव ससे, अशोकराव आगरकर, श्रीधर नांगरे, नानासाहेब दळवी, तसेच जागरूक नागरिक मंचाचे सचिव कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, जय कुमार मुनोत, प्रकाश शिंदे, श्यामा साठे, योगेश गंणगले, छावा संघटनेच्या सुरेखा सांगळे, हर्षल व्यवहारे, ओंकार व्यवहारे, परेश व्यवहारे आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुळे म्हणाले काटवन खंडोबा हा नगरमधील सर्वात महत्त्वाचा शॉर्टकट रस्ता रस्ता आहे. येथून तीन मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशन व दिल्ली गेटला जाता येते. मात्र स्वतंत्र्यानंतर या रस्त्याचे भाग्य उजाळले नाही. या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलकांशी उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे यांनी चर्चा करत लेखी आश्वासन दिले. रस्त्याचे काम सुरू झाले नाही बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा यावेळी आंदोलकांनी दिला.