थंडीतही उबदार कपड्यांमध्येही आता तरुणाईची फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:47 PM2019-12-17T12:47:15+5:302019-12-17T12:48:47+5:30
थंडीने आता चांगलाच जोर धरला आहे. तापमान १२ ते १५ अंशावर असले तरी रात्रीची थंडी चांगलीच वाढली आहे. कानटोपी, मफलर, स्वेटर विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे.
शुभम् तांगडे ।
अहमदनगर : थंडीने आता चांगलाच जोर धरला आहे. तापमान १२ ते १५ अंशावर असले तरी रात्रीची थंडी चांगलीच वाढली आहे. कानटोपी, मफलर, स्वेटर विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे. थंडीपासून बचाव करायचा मात्र तोही फॅशनसह असेच सध्या रुढ झाले आहे.
ऋतुप्रमाणे कपड्यांची फॅशनही बदलते. आपण इतरांपेक्षा अधिक वेगळे आणि आकर्षक कसे दिसू याकडे सर्वांचे लक्ष आहे. आधी काही ठराविक कपडे थंडीपासून बचावासाठी वापरले जायचे. परंतु आता काळासोबत फॅशनचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यामुळे आता बाजारपेठाही वेगवेगळ्या प्रकारच्या हिवाळी कपड्यांनी फुलून गेलेल्या दिसतात. त्यासोबत आता आॅनलाईन खरेदीचा पर्यायही उपलब्ध आहे.
मुलींसाठी लाँग श्रग, हायनेट कुर्ती,स्कार्फ नेट वुलन कुर्ती, थंडीमध्ये पार्टीला जायचे असेल आणि वनपिस घालणार असाल तर त्यासाठी डेनिमचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. हिवाळ्यात आवडीचा स्कर्ट परिधान करायचा असेल तर पाय झाकण्यासाठी स्टॉकिंग्ज बाजारात उपलब्ध झाले आहेत. आजकाल कॉलेजला जाणाºया तरुणाईमध्ये हुडचा (झिपर) पर्याय अधिक वापरला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विंटर कॅप, मफलर, नेटेड टी शर्ट यासोबतच लेदर जॅकेटची जास्त क्रेझ पाहायला मिळते. थंडीपासून बचावासोबतच डॅशिंग आणि कुल लुक यामध्ये दिसतो. नुकतीच थंडी वाढली आहे. थंडीमध्ये सकाळी बाहेर पडायचे म्हटले तर बाहेरची थंडी अंगावर शहारे आणते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचा वापर केला जायचा. हल्ली घरातील जुन्या स्वेटरकडे कोणी डोकावत नाही. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नवीन ट्रेण्ड नुसार बाजारात विंटर कलेक्शन उपलब्ध आहेत. ज्याने ऊब तर मिळतेच शिवाय छान लुकही येतो. वेगवेगळे जॅकेट्स स्कार्फ , स्टोल तसेच वेगवेगळ्या रंगाचे आणि पॅटर्नचे श्रग, शॉल असे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत, असे न्यू आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रीती झांबरे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. परंतु थंडीपासून बचावासोबत उत्तम व्यक्तिमत्त्व दिसणेही महत्वाचे आहे. रोज काय नवीन ड्रेसिंग करायचे हा प्रश्न असतोच. परंतु अनेक पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु लेदर जॅकेट आणि वेगवेगळ्या मफलर याकडे मुले जास्त आकर्षित होताना दिसतात, असे न्यू आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थी अंकुश कोरे यांनी सांगितले.
काळासोबत नवनवीन फॅशन ट्रेंड आल्यामुळे थंडीपासून बचावासोबत फॅशनचाही विचार करताना ग्राहक दिसतो. आम्ही पण नवनवीन फॅशन आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करून वेगवेगळ्या व्हरायटी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असे नगर येथील विक्रेते सत्येंद्र यादव यांनी सांगितले.