यंदाही हिंदू नववर्षाची सुरुवात कोरोनाच्या सावटाखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:06+5:302021-04-11T04:20:06+5:30
दहिगावने : चैत्र महिन्याच्या प्रारंभी येणाऱ्या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. मागील वर्षी २५ मार्च रोजी गुढीपाडवा होता. मात्र ...
दहिगावने : चैत्र महिन्याच्या प्रारंभी येणाऱ्या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. मागील वर्षी २५ मार्च रोजी गुढीपाडवा होता. मात्र कोरोनाच्या सावटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. यंदा गुढीपाडवा १३ एप्रिल रोजी असून, कोरोनाच्या सावटामुळे साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. उलट मागील वर्षीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती गंभीर आहे. दुकाने बंद असल्याने आर्थिक उलाढालीही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थसंकटाचा आलेख चढताच राहणार आहे.
चैत्र महिना सुरू झाला की रब्बी हंगाम संपून शेतकऱ्यांकडे चार पैसे येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची गाडी आणखी नेटाने फिरते. गुढीपाडव्याला किराणा, कापड व मिठाई व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होते. ग्रामीण भागातही सोने खरेदी, वाहन खरेदी होऊन कोटीची उड्डाणे गाठली जातात. अनेक जण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायाची सुरुवात करतात. कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे या सर्व उलाढालींना मागील वर्षी लगाम लागला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या वार्षिक ताळेबंदावर विपरीत परिणाम झाला. यावर्षीही तेच दिवस डोळ्यासमोर असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चैत्र महिन्यातच खेडेगावात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदेवी-देवतांच्या यात्राही भरतात. नोकरीनिमित्त परगावी गेलेले चाकरमानीही गावी परततात. गाव कितीही छोटे असले तरी वर्षातून एकदा भरणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक उलाढाल होतात.
गावोगावचे आठवडे बाजार सध्या बंद झाल्याने छोट्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचेही भाव गडगडले आहेत. मागील वर्षभरापासून अर्थचक्र अडखळते आहे, सद्य:परिस्थितीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणखी विपरीत परिणाम होतील या भीतीने शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंताग्रस्त आहेत.
--
दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामीण भागात कापड व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षी त्याला ब्रेक लागले. यावर्षीही तीच परिस्थिती समोर असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. तरीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे.
-अरुण चव्हाण,
कापड व्यावसायिक, दहिगावने, ता. शेवगाव
----
कोरोना लसीकरणास पात्र असलेल्यांनी लस घ्यावी. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे.
-अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव