सदाबहार राजकारणी : अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते

By सुधीर लंके | Published: August 5, 2018 11:51 AM2018-08-05T11:51:58+5:302018-08-05T12:00:13+5:30

राज्यातील जे दलित नेते व्यापक राजकारण करु पाहत होते त्यात अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या नावाचा समावेश होतो. ‘सदाबहार’ आणि गांधी-आंबेडकरी विचारधारेचे पाईक ही त्यांची ओळख होती. दादासाहेब रुपवते यांचा वैचारिक वारसा त्यांनी समर्थपणे चालविला. त्यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या आठवणी जागविणारा हा लेख...

Evergreen politician | सदाबहार राजकारणी : अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते

सदाबहार राजकारणी : अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते

सुधीर लंके
राज्यातील जे दलित नेते व्यापक राजकारण करु पाहत होते त्यात अ‍ॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या नावाचा समावेश होतो. ‘सदाबहार’ आणि गांधी-आंबेडकरी विचारधारेचे पाईक ही त्यांची ओळख होती. दादासाहेब रुपवते यांचा वैचारिक वारसा त्यांनी समर्थपणे चालविला. त्यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या आठवणी जागविणारा हा लेख...
आंबेडकरी आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा दुवा प्रेमानंद रुपवते यांच्या रुपाने शनिवारी निखळला. केवळ दलित चळवळीपुरते सीमीत न राहता राज्यातील जे दलित नेते व्यापक राजकारण करुन पाहत होते व मान्यता मिळवत होते त्यात प्रेमानंद रुपवते यांच्या नावाचा समावेश होतो.
प्रेमानंद रुपवते हे ‘बाबुजी’ या नावाचे परिचित होते. राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री दादासाहेब रुपवते यांचे ते थोरले चिरंजीव. दादासाहेब हे आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात प्रबुद्ध भारतच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दादासाहेब हे मूळचे नगर जिल्ह्यातील अकोले येथील. शिक्षणानिमित्त ते मुंबईत सिद्धार्थ बोर्डिंगला राहत होते. पुढे बाबासाहेबांनी त्यांच्यावर सिद्धार्थ नाईट हायस्कूलची जबाबदारी दिली होती. नगर जिल्ह्यात आंबेडकरी व पुरोगामी चळवळ मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. लोक त्यांना बाबासाहेब यांचे ‘लेप्टनंट’ म्हणूनच ओळखत.
दादासाहेब रुपवते यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे की एका जातीच्या जोरावर आपण राजकारण करु शकत नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी ‘शेकहँड’ केला व ते कॉंग्रेसच्या प्रवाहात सामील झाले. यशवंतरावांनीही त्यांना कॉंग्रेसमध्ये सन्मान दिला. हा संदर्भ एवढ्यासाठीच की, दादासाहेबांच्या विचाराचे हे ‘स्कूल’ पुढे त्यांचे पुत्र प्रेमानंद रुपवते यांनी समर्थपणे चालविले. दादासाहेब जात-पात मानत नव्हते. प्रेमानंद हेही त्याच परिवर्तनवादी विचाराचे. त्यांनी आंतरजातीय विवाह केला. माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे ते जावई. दोन मंत्र्यांच्या घरात झालेला हा आंतरजातीय विवाह ही त्या काळात खूप कौतुकाची व धाडसाची गोष्ट होती.
दादासाहेबांनी बहुजन शिक्षण संघाची स्थापना करुन नगर जिल्ह्यात जवळपास प्रत्येक तालुक्यात वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहांमध्ये दलित व बहुजन समाजातील अनेक मुले शिकली. एकाअर्थाने या शिक्षण संघाने पिचलेल्या वर्गाला शहाणे करण्यात खूप मोठी भागीदारी दिली. दादासाहेबांच्या नंतर या बहुजन शिक्षण संघाचा गाडा प्रेमानंद रुपवते यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांचे प्राथमिक व पुढील शिक्षण अकोले व नगर येथे झाले. पुढे ते मुंबईत गेले.
प्रभावी वक्तृत्व, दिलदार स्वभाव आणि गरीब, कष्टकरी समाजाप्रती बांधिलकी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. भाषणात शेरोशायरी पेरत व अस्खलित उदाहरणे देऊन सभा जिंकण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी चेंबूर, कर्जत-जामखेड, नायगाव या विधानसभा मतदारसंघांतून निवडणुका लढविल्या. परंतु त्यांना विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, कॉंग्रेसच्या कोट्यातून रामदास आठवले शिर्डीत आल्याने प्रेमानंद यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ही त्यांची कॉंग्रेसविरोधातील बंडखोरी होती. मात्र, त्यानंतरही कॉंग्रेसचा व धर्मनिरपेक्षतेचा विचार त्यांनी कधी सोडला नाही. ते व त्यांची मुलगी उत्कर्षा नंतर कॉंग्रेसमध्येच सक्रीय राहिले. २००९ च्या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात जातीच्या पातळीवर जाऊन जो दुर्देवी प्रचार झाला त्याचे रुपवते हेही बळी ठरले.
वडिलांप्रमाणे त्यांनीही आपल्या मुलींचे विवाह आंतरजातीय पद्धतीने लावले. थोरल्या मुलीचा आंतरधर्मीय विवाह केला. तर दुसरी मुलगी उत्कर्षा हिचाही विवाह हा आंतरजातीय आहे. कॉंग्रेसचे काही काळ ते राज्याचे प्रवक्ते होते. विविध प्रश्नांसाठी त्यांनी प्रितिसंगमापासून सायकल यात्राही काढली होती. पुरोगामी चळवळीसाठी ते आधारस्तंभ होते. वेळ, पैसा अशा सर्व पातळ्यांवर ते सतत चळवळीला मदत करत. ‘प्रवर्तणाय’ नावाचे नियतकालिकही त्यांनी काही काळ चालविले. अकोले महाविद्यालयाच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या घरात मुक्त संवाद होता. हे घर जनतेसाठीही खुले होते. या घरात राष्टÑीय एकात्मताही दिसत होती. ‘देवानंद’ हे चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेते म्हणून ओळखले जात. प्रेमानंद रुपवते यांचे व्यक्तिमत्वही हसतमुख व राजबिंडे होते. हा सदाबहार व माणुसकीने ओतप्रोत भरलेला राजकारणी होता.

(लेखक हे ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

Web Title: Evergreen politician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.