शहरात दररोज साचतोय तब्बल ४५० टन कचरा; संकलनापोटी महिन्याला अडीच कोटींचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 07:23 PM2019-12-28T19:23:39+5:302019-12-28T19:25:19+5:30
कचरा संकलनापोटी महिन्याकाठी अडीच कोटींचे बिल
औरंगाबाद : शहरातील ९पैकी ८ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. या कंपनीकडून दररोज ४५० टन कचरा उचलला जात असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये ३९० टन कचरा जमा होत होता. अवघ्या महिनाभरात तब्बल ६० टनाने कचरा वाढला आहे.
शहरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर शासनाने कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून ४ प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. परंतु या प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू आहेत. शहरात कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनीकडून केले जात आहे. या कंपनीला प्रतिटनासाठी १६६२ रुपये महापालिकेकडून दिले जातात. यामध्ये महापालिकेच्या ९ पैकी ८ झोनमधून कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. या ८ झोनमधून ४५० टन कचरा जमा होत असल्याची माहिती गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल केले जात असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु टनाटनाने कचरा वाढत असल्याने महापालिका आता जागी झाल्याचे दिसते. त्यासाठी खबरदारीचे पाऊल महापालिकेकडून उचलले जात आहे. कचरा डेपोच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी आंदोलन झाले. कचऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे राज्य शासनाने निधी दिला. त्यातून चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. चिकलठाणा प्रकल्प सोडले तर उर्वरित तिन्ही प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. ही परिस्थिती असताना कचरा संकलनापोटी महिन्याकाठी कोट्यवधी रुपये जात आहेत. कंपनीकडून झोन- ६ मध्ये अद्यापही कचरा संकलन होत नाही. तर झोन-४ मधील अर्ध्या वॉर्डांमध्ये संकलनाचे काम होते. असे असतानाही महिनाभरात ३९० टनावरून कचरा ४५० टनावर गेला आहे. कचरा संकलनापोटी महिन्याकाठी महापालिकेचे अडीच कोटी जात आहेत.
स्वतंत्र वाहने देणार
ग्रीन वेस्ट आणि बांधकाम साहित्य (डेबरिज) उचलण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पावसामुळे कचऱ्याचे वजन वाढत असल्याचा दावा कंपनीने मध्यंतरी केला होता. परंतु पावसाळा संपल्यानंतरही कचऱ्याचे वजन ४५० टनावर गेले आहे. स्वतंत्र वाहने दिल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन द्यावे लागणारे बिल कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
कचरा प्रक्रिया केंद्र अद्यापही बांधकामातच
चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पासाठी वजनकाटा बसविण्याची निविदा ९ महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही वजनकाटा बसविण्यासाठी आवश्यक असलेले बांधकामच सुरू आहे. त्यामुळे महापालिका कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला खाजगी काट्यावर केलेल्या वजनानुसार रक्कम मोजत आहे. वजनकाट्याचे काम आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु वजनकाटा बांधकामातच अडकला आहे. वजनकाट्यासाठी पाया तयार करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.