प्रत्येक तालुक्यात दररोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:11+5:302021-04-10T04:21:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे तालुका स्तरावर योग्य त्या उपाययोजना करा, तसेच दररोज एक ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे तालुका स्तरावर योग्य त्या उपाययोजना करा, तसेच दररोज एक हजारच्या पुढे कोरोना टेस्ट कराव्यात आणि त्याची ऑनलाईन माहिती तत्काळ भरावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची ऑनलाईन बैठक गुरुवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. त्यात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी दादासाहेब साळुंके, प्रकाश लांडगे आदींसह तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. प्रत्येक तालुक्यात लसीकरण मोहीम वाढवण्यात यावी तसेच तालुक्यामधील कोविड केअर सेंटरमध्ये असणाऱ्या रुग्णांची दक्षता घ्यावी. त्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरवाव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर मोठ्या प्रमाणात भर देऊन त्यांच्या चाचण्या कराव्यात. जे रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करावे, याशिवाय प्रत्येक तालुक्यात दररोज एक हजारच्या पुढे टेस्ट झालेल्या असाव्यात व त्याची ऑनलाईन माहिती तत्काळ भरण्यात यावी. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारण्याच्या काही तक्रारी आहेत. त्यादृष्टीने गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या समितीसोबत अशा रुग्णालयांचे ऑडिट करून दोषी रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करावी. रेमडीसिविर इंजेक्शन जास्तीच्या भावात मेडिकलमध्ये विकत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना शेळके यांच्यासह डॉ. सांगळे यांनी दिल्या.
-----------
सीएचओ उपकेंद्रात हवेत
सध्या आरोग्य उपकेंद्रामध्येही रुग्णांची गर्दी होत आहे. त्या अनुषंगाने सीएचओ यांनी प्रत्येक उपकेंद्रात उपस्थित राहाणे गरजेचे आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक उपकेंद्रात सीएचओ हजर राहतात की नाहीत, याची तपासणी करावी. ते हजर राहत नसतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.