प्रत्येक शेतक-याला ‘डीपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:11 PM2018-07-07T16:11:42+5:302018-07-07T16:12:04+5:30
एकाच रोहित्रावर (डीपी) अनेक वीजजोड असल्याने शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा न होेणे किंवा रोहित्रांत वारंवार बिघाड होणे, या गोष्टीपासून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. आता महावितरणच्या नव्या योजनेनुसार किमान १ व कमाल ३ शेतक-यांना स्वतंत्र्य रोहित्र मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ हजार ७०० शेतक-यांना ही उच्चदाब जोडणी मिळणार आहे.
अहमदनगर : एकाच रोहित्रावर (डीपी) अनेक वीजजोड असल्याने शेतक-यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा न होेणे किंवा रोहित्रांत वारंवार बिघाड होणे, या गोष्टीपासून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. आता महावितरणच्या नव्या योजनेनुसार किमान १ व कमाल ३ शेतक-यांना स्वतंत्र्य रोहित्र मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११ हजार ७०० शेतक-यांना ही उच्चदाब जोडणी मिळणार आहे.
नाशिक परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम) वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणा-या ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून अहमदनगर जिल्ह्यात १६० कोटी रुपये किमतीच्या कामातून जवळपास ११ हजार ७०० शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.
मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून होणा-या कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतक-यांना थेट फायदा होणार आहे. परिसरातील इतर शेतक-यांनाही योजनेतून होणा-या कामांचा लाभ मिळेल. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवोल्टचे स्वतंत्र रोहित्र उभाण्यात येणार आहेत. परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवोल्टच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. याव्यतिरिक्त आकडे टाकून चो-या करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र नादुरुस्त (जळण्याचे) होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीजवितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होणार आहे. उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व या प्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीज जोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरुस्त होण्याच्या तक्रारी दूर होतील. परिणामी योग्य दाबाने वीज पुरवठा शक्य होणार आहे.
जिल्ह्यात १६० कोटींची कामे
येत्या १५ महिन्यांच्या आत या योजनेतील कामे संपविण्याबाबत सूचना आहेत. मात्र शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून, त्यानुसार कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अहमदनगर मंडळ कार्यालयांतर्गत १६० कोटी ५१ लाख रुपये खर्चाच्या ४१ निविदा काढण्यात आल्या असून यातून ११ हजार ६६१ शेतक-यांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.