माजी सैनिकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:59+5:302021-02-13T04:19:59+5:30
कोपरगाव : तालुक्यातील एक्स - सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्यावतीने तहसील कार्यालयात विविध समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील ...
कोपरगाव : तालुक्यातील एक्स - सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्यावतीने तहसील कार्यालयात विविध समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात शुक्रवारी ( दि.१२ ) बैठक पार पडली. या बैठकीत माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता - पिता यांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला असून, या समस्यांची सोडवणूक करण्याची यावेळी मागणी केली.
या बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे, तहसीलदार योगेश चंद्रे, सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, शहरचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नगर परिषदेचे उप-मुख्याधिकारी सुनील गोर्डे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल होन, उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर, सचिव संदीप ताकवाले, सैनिकी मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक ए. एम. शेख यांच्यासह शंभरपेक्षा अधिक माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता - पिता उपस्थित होते.
उत्तर जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी शिर्डी येथे मध्यवर्ती ठिकाणी सी. एस. डी. कँटिंग सुरू करावी. ई. सी. एस. पॅनेल हॉस्पिटलमध्ये शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व कोपरगाव येथील एसजेएस हॉस्पिटल यांना पॅनलमध्ये समाविष्ट करून घ्यावे. माजी सैनिकांच्या जागेविषयी, जमिनीविषयी, जागेतील अतिक्रमण, बांधाचे रस्ते, घरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वाढीव वीज बिलासंदर्भात अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून तक्रारी दूर कराव्यात. माजी सैनिकी होस्टेलच्या मोकळ्या जागेत माजी सैनिकांना गाळे बांधून भाडेतत्वावर देण्यात यावेत. यासह माजी सैनिक वीर पत्नी, वीर माता - पिता यांना येणाऱ्या विविध समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी आभार मानले.
फोटो१२- माजी सैनिक बैठक - कोपरगाव