साईदरबारी होलिकाेत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:58+5:302021-03-29T04:14:58+5:30
शिर्डी : येथे साई संस्थानमध्ये रविवारी पारंपरिकपणे होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला. वाईट विचार, विकार, राग, द्वेष, मत्सर ...
शिर्डी : येथे साई संस्थानमध्ये रविवारी पारंपरिकपणे होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला. वाईट विचार, विकार, राग, द्वेष, मत्सर यांना भस्मसात करून मांगल्य निर्माण करणारा हा होलिकाेत्सव भाविकांच्या जीवनात समृद्धी आणो, कोरोनाचे संकट दूर होवो, असे साकडे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साईबाबांना घातले.
होळी सणानिमित्ताने समाधी मंदिरातील साईमूर्तीला साखरेचे गाठी, कडे व सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी दुपारी माध्यान्ह आरतीपूर्वी गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. रानशेणी गोवऱ्या, ऊस व एरंडाची फांदी याचा या होळीत अंतर्भाव होता. सभोवती सुंदर रांगोळी रेखाटून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते मंत्रोच्चारात होळी पेटवण्यात आली. गणपती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर शिर्डी माझे पंढरपूर.. या साईबाबांच्या आरतीने सांगता करण्यात आली. होळीला पुरणपोळीसह आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, वैशाली ठाकरे, मंदिरप्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते. या पूजेचे पौरोहित्य दिलीप सुलाखे, अमित देशमुख यांनी केले.
....
फोटो-२८शिर्डी होळी उत्सव
...
ओळी-शिर्डी येथे साई संस्थानमध्ये रविवारी पारंपरिक पद्धतीने होळी पेटवून वसंतोत्सव साजरा करण्यात आला.