विस्तारित सुपा एमआयडीसीतील कारखानदार धुळीने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:04+5:302021-01-04T04:19:04+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीतील एका मुख्य रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावरील माती, धुळीचे कण ...
सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा औद्योगिक वसाहतीतील एका मुख्य रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावरील माती, धुळीचे कण यामुळे येथील कारखानदार हैराण झाले आहेत. धुळीचा परिणाम कारखान्यातील उत्पादित मालाच्या गुणवत्तेवरच होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे उठणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह, पादचाऱ्यांना जेरीस आणले आहे. त्यामुळे रखडलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
विस्तारित सुपा एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण होत आली असून म्हसणे फाट्यावरून पूर्वेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत केएसपीजी, कॅरिअर मायडिया, टोशीबा, मिंडा आदी कंपन्या आहेत. मोठ-मोठ्या कारखान्यात काम करणारे कामगार नगर, शिरूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी भागाकडे जाणारे प्रवासी त्यांची वाहने, विसापूर, रूई छत्रपती, बाबूर्डी, भोयरे गांगर्डा, रांजणगाव रस्ता, धाडगेवाडी, चांभुर्डी आदी परिसरातून येणाऱ्या लोकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते.
पूर्वीचा डांबरी रस्ता खणून काढला आहे. रस्ता चारपदरी होणार आहे. त्याचे रुंदीकरण झाल्याने जवळपास २ किलोमीटर मातीमय कच्चा रस्ता तयार झाला आहे. मातीचे, धुळीचे लोट उठतात. या कच्च्या रस्त्यालगत मिंडा कंपनी आहे. अखेरच्या टप्प्यातील काम अपूर्ण राहिले. इतर कारखान्यांसमोरील चारपदरी रस्ता, दुभाजक, त्यात फुललेली झाडे, त्याला आलेली फुले यामुळे एखाद्या मोठ्या शहरात आल्यासारखे वाटते.
-----
कच्च्या रस्त्यावरील धूळ कारखान्यात येत असल्याने संगणक, सीएनसी मशिनरींना बाधा निर्माण होत आहेत. तयार उपकरणांना पेंटिंग करताना धुळीच्या कणांच्या संसर्गाने उत्पादित मालाची गुणवत्ता व दर्जा यावर परिणाम होत आहे. याबाबत एमआयडीसीकडे तक्रार केली आहे व तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
-उल्हास नेवाळे,
व्यवस्थापक, मिंडा
-----
सुपा एमआयडीसी,
विस्तारित एमआयडीसीतील रस्त्याचे काम सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल.
-गणेश वाघ,
अभियंता, एमआयडीसी
फोटो ०३ सुपा रोड
विस्तारित सुपा एमआयडीसीतील काम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर अशी धूळ उडते.