कोरोना संकटकाळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील-आयुक्त श्रीकांत मायकलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 03:52 PM2020-12-30T15:52:09+5:302020-12-30T15:53:31+5:30
मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोना संकटकाळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन मावळते आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सेवानिवृत्तीनिमित्त मनोगत व्यक्त करताना केले.
अहमदनगर : मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोना संकटकाळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन मावळते आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सोमवारी सेवानिवृत्तीनिमित्त मनोगत व्यक्त करताना केले.
आयुक्त म्हणून रुजू झालो त्यावेळी सर्व परिस्थिती नवीन होती. शहराची माहीती नव्हती, कर्मचाऱ्यांची माहिती नव्हती. तरीही आम्ही सर्व अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो. दैनंदीन स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी नित्य व अत्यावश्यक सेवा अखंडपणे सुरू ठेवली. कोरोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन त्यात नगरकरांची साथ लाभल्याने यश मिळवले, असेही माकलवार म्हणाले.
दरम्यान उपजीवीका व रोजगारासाठी मोठया शहरांत गेलेल्या नागरिकांनी आपापल्या गावी परतीचा प्रवास सुरू केला. अनेक गोरगरिबांनी अक्षरशः पायपीट सुरु केली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने या सर्वांची व्यवस्था महानगरपालिकेने केली. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने किचन सुरू करून दररोज सुमारे एक हजार नागरिकांच्या भोजनाची सुविधा सलग पाच महिने उपलब्ध करुन दिली, यात मोठे समाधान मिळाले. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारांसाठी कोविड सेंटर सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.