घारगावात पिवळ्या कलिंगडाच्या शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:03+5:302021-03-27T04:21:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव : जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांत टरबूज या पिकाची लागवड करण्यात येते. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ...

Experiment of yellow watermelon cultivation in Ghargaon | घारगावात पिवळ्या कलिंगडाच्या शेतीचा प्रयोग

घारगावात पिवळ्या कलिंगडाच्या शेतीचा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क

घारगाव : जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांत टरबूज या पिकाची लागवड करण्यात येते. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने पिवळ्या रंगाच्या कलिंगडाच्या शेतीचा अनोखा यशस्वी असा प्रयोग केला आहे. बाहेरून हिरवा अन् आतून पिवळा रंग असणाऱ्या, साखरेसारख्या गोड असलेल्या टरबुजांना बाजारात मागणी आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट, शेतमालाला भाव नसणे, अशा एक ना अनेक संकटांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो. इतर शेतकऱ्यांप्रमाणेच या संकटांचा सामना करणाऱ्या किरण लक्ष्मण धात्रक यांनी आतून पिवळा रंग असलेल्या टरबुजाची शेती केली आहे. त्यांनी तैवानच्या कलिंगडाची लागवड करीत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. धात्रक यांनी अथक परिश्रम करून त्यांच्या एक एकर क्षेत्रात तैवानच्या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.

टरबुजाची लागवड करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन बियाणे मागविले होते. अडीचशे ग्रॅम वाणांचे बियाणे अठरा हजार रुपयांना खरेदी केले. मल्चिंग पेपर टाकून ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आला. या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचा फायदा त्यांना उत्पादन वाढीसाठी झाला. टरबूज पिकविण्यासाठी एकरी साठ हजार रुपये इतका खर्च झाला आहे. ७५ ते ८० दिवसांत माल काढणीला आला. सुमारे दोनशे क्विंटलहून अधिक कलिंगडांचे उत्पादन झाले आहे. आतून पिवळा रंग असल्याने ग्राहक या टरबुजांकडे आकर्षित होत असून

बाजारात मागणी आहे. अजूनही भाव मिळाल्यास अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे धात्रक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

--------------

दरवर्षी लाल कलिंगडांची लागवड करतो. यंदा अडीच एकर लाल व एक एकर पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे. पिवळ्या कलिंगडाचे चांगले उत्पादन झाले आहे. चवीने स्वादिष्ट आहे.

‌- किरण धात्रक, शेतकरी घारगाव, ता. संगमनेर.

Web Title: Experiment of yellow watermelon cultivation in Ghargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.