तज्ज्ञांचे मत : बोलीभाषेत बदल करताना उडणार गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:21 PM2019-06-21T13:21:13+5:302019-06-21T13:22:42+5:30
यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे.
अहमदनगर : यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे ही पद्धत व्यवहार्य नसून यामुळे बोलीभाषेत, तसेच दैनंदिन व्यवहारात नव्या-जुन्या पिढीचा गोंधळ उडणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञांनी दिल्या.
यंदाच्या दुसरीच्या गणित पुस्तकात संख्यावाचन करताना बेचाळीसऐवजी चाळीस दोन, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन असा बदल करत ही पद्धत मुलांना शिकवण्यास सांगितले आहे. बदललेली ही अंक वाचन पद्धत व्यवहार्य आहे की गोंधळ उडवणारी आहे, याबाबत ‘लोकमत’ने शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालकांशी चर्चा केली. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.
काहींच्या मते ही गणित वाचन पद्धत विद्यार्थ्यांसाठी वरून सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात गोंधळ उडवणारी आहे. बोलीभाषेतील काही म्हणी, आडनाव, तारखा या पारंपरिक अंक वाचन पद्धतीने उच्चारल्या जातात.
सध्या विद्यार्थ्यांनी जरी बदललेली वाचन पद्धत अंगिकारली, तरी इतर मराठीच्या पुस्तकांत किंवा व्यवहारात जुन्याच पद्धतीने संख्येची फोड केलेली असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम उडणार असून हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असा काहिसा सूर या चर्चेतून समोर आला.
दुसरीकडे काहींच्या मते नवी संख्या वाचन पद्धत सुटसुटीत आहे. इंग्रजीमध्ये सध्या आपण ती शिकतो आहोतच. मग मराठीत विरोध का? त्यामुळे ही पद्धत सोपी व मुलांना फायदेशीर आहे.
लहान संख्येपुरती नवीन वाचन पद्धत ठिक आहे. परंतु तीन, चार अंकी संख्या वाचन करताना अडचण होणार आहे. गणिताचे भाषिक ज्ञान समाजात रूजलेले आहे. ते बदलण्यात अर्थ नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित होतील. यातून गणितापुरते जोडशब्द जरी टाळले, तरी इतर जोडशब्दांचे काय? त्यामुळे हा बदल योग्य नसून त्याचा पुनर्विचार व्हावा व पूर्वीचीच पद्धत चालू ठेवावी. - संजय कळमकर, शिक्षक, साहित्यिक
सध्या बऱ्याचशा मराठी शाळांत सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यामुळे नवीन अंक वाचन पद्धत इंग्रजी अंकगणिताशी ताळमेळ घालणारी आहे. पूर्वीच्या पद्धतीत काही आकडे लिहिण्यास व उच्चारण्यासही अवघड होते, त्यामुळे संख्याज्ञान न होता मुले अप्रगत राहायची. नवीन वाचन पद्धत मुलांना समजण्यास सोपी आहे. - राजू बनसोडे, शिक्षक, जि. प. शाळा वाकडी, ता. राहाता
ही पद्धत नवीन नाही. मागील वर्षीही पहिलीच्या पुस्तकात अशी अंक ओळख दिलेली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनेमध्ये स्पष्ट लिहिले आहे की संख्या शब्दात लिहिताना विद्यार्थ्यांकडून एकच प्रकार अपेक्षित आहे उदा. ४७ साठी चाळीस सात किंवा सत्तेचाळीस. त्यामुळे विद्यार्थ्यांना जी पद्धत सोयीची व सोपी वाटते तिचा वापर शिक्षकांनी करावा. - विक्रम अडसूळ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक
नवीन पद्धत कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य नाही. इंग्रजीत इलेव्हनला आपण टेन वन असे म्हणत नाही. मग मराठीत असे बदल करण्याचे कारण नाही. शासनाने कोणतीही चर्चा न करता एवढा मोठा बदल करणे चुकीचे आहे. जोडाक्षर सोपे करण्यासाठी हे केले असेल तर अंक वाचन सोडून इतर ठिकाणी येणाºया जोडाक्षराचे काय? त्यामुळे पारंपरिक अंक वाचन पद्धतच बरोबर आहे. - डॉ. सर्जेराव निमसे, शिक्षणतज्ज्ञ