पुरातन बारव, मंदिरांची तज्ज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:34+5:302020-12-23T04:17:34+5:30
कर्जत : शहरातील ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असलेल्या पुरातन बारव, विहिरी, मंदिर यांची तज्ज्ञांनी पाहणी केली. शहरातील काही पुरातन वास्तूंचे ...
कर्जत : शहरातील ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असलेल्या पुरातन बारव, विहिरी, मंदिर यांची तज्ज्ञांनी पाहणी केली. शहरातील काही पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचे काम करणारे प्रा. वरुण भामरे यांच्यासह पथकाने येथे पाहणी केली.
कर्जत शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या आकर्षक बारवाकडे लक्ष द्यावे व त्याचे पुनरुज्जीवन करावे, अशी कल्पना भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी मांडली होती. त्यांच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत नगर पंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पाहणी केली. ही बाब आ. रोहित पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना काम करण्याबाबत चर्चा केली. याचा आराखडा तात्काळ बविण्याबाबत सूचना दिल्या.
मंगळवारी या पथकाने कर्जत शहरातील विविध ठिकाणावरील पाच बारवा व विहिरी तसेच तीन पुरातन मंदिरे यांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये वीरशैव लिंगायत समाज मठातील महादेव मंदिराजवळील बारव, राशीन बारव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोरील आड, नागेश्वर मंदिर परिसरातील कुंड, काळा महादेव मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, तोरडमल तालमी शेजारील आड आदींची पाहणी केली. या पथकाचे वास्तुविशारद प्रवीण वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक अभ्यास करून या वास्तूची मापे घेऊन प्रकल्प अहवाल करावयाचे काम सुरू केले आहे.
यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा, भीमाशंकर पखाले आदी उपस्थित होते.
फोटो : २२ कर्जत बारव
कर्जत येथे जुन्या बारवेची पाहणी करताना तज्ज्ञांचे पथक.