कोेपरगाव तालुक्यातील उजनी योजनेसाठी एक्स्प्रेस फिडर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 07:36 PM2018-04-04T19:36:43+5:302018-04-04T19:37:08+5:30
कोेपरगाव तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजना स्तर एक व दोन तसेच रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख ९१ हजार रूपये खर्चाचे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले आहे.
कोेपरगाव : तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजना स्तर एक व दोन तसेच रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख ९१ हजार रूपये खर्चाचे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ५२ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच औरंगाबादचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ तसेच गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. पावसाळयापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संगमनेरच्या उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी उपअभियंता दिलीप ढिकले यांना दिल्या आहेत.
गोदावरी उजव्या कालव्यावरून पावसाळयात ओव्हरफलोचे वाहून जाणारे पाणी रांजणगांव देशमुख परिसरातील धोंडेवाडी, मनेगाव वेस, सोयेगाव, अंजनापूर, जवळके, बहादरपूर आदी अकरा पाझर तलाव, उजनी उपसा सिंचन योजनेतून भरण्याची योजना आहे. त्यासाठी यापूर्वी फक्त आठच तास वीज मिळत होती. त्यामुळे पूर्ण दाबाने हे पाझर तलाव भरले जात नव्हते. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर मंजूर करून सोळा तास पूर्ण दाबाने वीज उपलब्ध झाल्यास हा प्रश्न निकाली निघण्यासाठी मंत्री महाजन यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा करण्यात आल्याचे आ. कोल्हे यांनी सांगितले.