तोट्यातील पॅसेंजर होणार एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:42+5:302021-08-25T04:26:42+5:30
श्रीरामपूर : दौंड- मनमाड या रेल्वेमार्गावरील दौंड नांदेड पॅसेंजर रद्द करून त्याऐवजी दौंड ते भुसावळ ही साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू ...
श्रीरामपूर : दौंड- मनमाड या रेल्वेमार्गावरील दौंड नांदेड पॅसेंजर रद्द करून त्याऐवजी दौंड ते भुसावळ ही साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. पॅसेंजर रेल्वेचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याविरुद्ध रेल्वे सल्लागार समितीने प्रशासनाकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
दररोज दुपारी १२ वाजता दौंड येथून सुटणारी नांदेड पॅसेंजर ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोयीची होती. जिल्ह्यातील सर्व छोट्या- मोट्या रेल्वेस्थानकांवर तिला थांबा होता. मराठवाड्यातून येणाऱ्या मजुरांना अत्यल्प पैशांमध्ये ती सेवा देत होती. मात्र, लॉकडाऊनच्या नावाखाली ती बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून ओरड होत आहे. त्याऐवजी दौंड भुसावळ ही साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाने तोट्यात चालणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे धोरण घेतलेले आहे. त्याचा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. छोटी रेल्वेस्थानके त्यामुळे ओस पडली असून, तेथील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------
शिर्डी दादरला मोजके थांबे
शिर्डीतून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राहुरी व श्रीगोंदा या तालुक्यांच्या स्थानकांवर थांबे देण्यात आलेले नाहीत. त्याविरुद्ध अनेकदा ओरड झालेली आहे. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. नुकत्याच झालेल्या सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली.
----------
दुहेरीकरणाचा लाभ नाही
दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर अंकाई ते कोपरगाव यादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. याशिवाय दौंड ते बेलवंडी हे कामही लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पुढील काळात संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरणाचे काम होईल. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही, असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
----------
सध्या एक्स्प्रेसमध्ये भरमसाठ गर्दी आहे. आरक्षणाशिवाय प्रवेश मिळत नाही. त्यामुळे पॅसेंजर हाच जनतेला आधार होता. रेल्वे बोर्डाने त्याबाबतीत आपले धोरण जाहीर करायला हवे.
-रणजित श्रीगोड, ज्येष्ठ नेते, प्रवासी संघटना, श्रीरामपूर
----------