विकासकामांच्या निधीस मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:25+5:302021-04-01T04:21:25+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या विकासकामांच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ...
अहमदनगर : जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या विकासकामांच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषद सदस्यांना आपापल्या गटामध्ये विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारा विकास निधी खर्च करण्यास ३१ मार्च ही अखेरची मुदत असते. परंतु, गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे अनेक अडचणी आल्या आहेत. अनेक कामे प्रलंबित असल्याने विकास निधी खर्चास ३१ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी, म्हणजे प्रलंबित कामे करता येतील. जिल्हा परिषदेचे सदस्य आपापल्या गटांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, शाळा खोल्या, अंगणवाड्या, नळ पाणीपुरवठा, सार्वजनिक गटारे, आदी विकासकामे स्थानिक विकास निधी अनुदानातून करीत असतात. परंतु, यंदा कोरोनामुळे या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढवून द्यावी, असे परजणे यांनी पत्रात म्हटले आहे.