मूलभूत विकास कामांसाठी मुदतवाढ : दिलीप गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:34 PM2018-08-06T15:34:46+5:302018-08-06T15:46:46+5:30
महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अहमदनगर : महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाकडून महानगरपालिकेस मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत तीन कोटी मंजूर केले होते. सदर निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार सदर कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१८ अखेर होता. या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे. निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे, प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता सदरची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण होणार नसल्याचे खा. गांधी यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना निदर्शनास आणले. त्यामुळे मुदतवाढ आवश्यक असल्याचे लक्षात आणून दिले.
महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून २०१८ मध्ये पूर्ण होत नसल्याने सदरच्या कामांना डिसेंबर २०१८ अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेतली. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत ही बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आल्याने ही मुदतवाढ मिळाल्याचे खा. गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे. याबाबत कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी महापालिकेस कळविले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.