तणनाशकावर उतारा काक-या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:03 PM2018-07-20T13:03:09+5:302018-07-20T13:03:30+5:30
वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत.
भाऊसाहेब येवले
राहुरी : वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. ग़ुलाब सरोदे यांची चार एकर जमीन आहे. दरवर्षी कपाशी, ऊस, भुईमूग अशी पिके घेतात. कपाशी या पिकावर कमी खर्च करण्याकडे त्यांचा कल आहे. कपाशीची दीड बाय चार या अंतरावर लागवड करण्यात आली आहे. कपाशी पीक उगवल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे कपाशीमध्ये गवत व वेल उगवण्यास सुरूवात झाली आहे. त्यावर उतारा म्हणून गुलाब सरोदे यांनी काक-या मारण्यास सुरूवात केली आहे.
सरोदे यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता ‘लोकमत’शी संवाद साधतांना सांगितले की, दोन एकर क्षेत्रावर भक्ती या वाणाची लागवड करण्यात आली आहे. कपाशी उगवल्यानंतर गवताचा बंदोबस्त करण्यासाठी काक-या मारल्या. त्यामुळे गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत झाली. कपाशी लावणीपासून ते कापूस वेचण्यापर्यंत पंचवीस हजार रूपये खर्च होतो. तण नियंत्रणासाठी खुरपणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे होणारा खर्च व उत्पन्न यामध्ये मेळ बसत नाही. त्यामुळे भाडोत्री बैलाच्या सहाय्याने काक-या मारल्या जातात. एकरी आठशे रुपये इतका अल्प खर्च काक-याला येतो. त्यामुळे कपाशी पिकाचे नुकसान न होता खर्च कमी होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.
कपाशी या पिकामध्ये यानंतर फरट मारण्यात येणार आहे. बाजरी पिकामध्येही आपण कोळपणीचा अवलंब करतो. मात्र भुईमूग पिकांमध्ये खुरपणी करून घेतो. उसाचे पीक गेल्यानंतर पाचरट न जाळता ते जमिनीत कुजविले जाते. त्यामुळे जमिनीला खत मिळून पोत सुधारण्यास मदत होते, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले. राज्यभर शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त असताना स्प्रिंकलरचा कपाशी पिकामध्ये वापर करण्यात आला. त्यामुळे पीक धुऊन निघाले. स्पिंकलरव्दारे पाणी मिळाल्याने कोणताही रोग, कीड व मावा आढळून आला नाही.
स्प्रिंकलरवर दोन एकरासाठी २७ हजार रूपये खर्च आला़ त्याचा वापर कांदा, भुईमूग या कमी वाढणा-या पिकासाठी होतो. सगळे रोग किडी धुऊन जातात. त्यामुळे मागील वर्षी एकही औषधाची फवारणी केली नाही़, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले.