राहुरीतील व्यापारी संघटनेत दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:34+5:302021-03-19T04:19:34+5:30

राहुरी : शहरातील रस्ता दुभाजकावरून आता व्यापारी संघटनांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. नुकतेच एका व्यापारी संघटनेच्या वतीने दुभाजकाला विरोध ...

A faction in the Rahuri trade association | राहुरीतील व्यापारी संघटनेत दुफळी

राहुरीतील व्यापारी संघटनेत दुफळी

राहुरी : शहरातील रस्ता दुभाजकावरून आता व्यापारी संघटनांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. नुकतेच एका व्यापारी संघटनेच्या वतीने दुभाजकाला विरोध करत प्रशासनास निवेदन दिले होते, तर आता इतर व्यापाऱ्यांनी ती संघटना भाजपप्रणीत असल्याने विकासकामात राजकारण करत असल्याचा आरोप केल्याने रस्ता दुभाजकावरून व्यापारी वर्गात दुफळी निर्माण झाली आहे.

राहुरी शहरातील अग्निशमन दल इमारत ते डॉ. खुरुद दवाखान्यापर्यंत रस्ता दुभाजकाचे काम करण्यात येणार आहे. या रस्ता दुभाजकाच्या कामाला येथील व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, विजय कोहकडे, सुभाष पवार, भय्यासाहेब शेळके, प्रभाकर ठोकळे आदींसह व्यापाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर मात्र शहरातील इतर व्यापाऱ्यांनी सदर मागणीला जोरदार विरोध केला आहे. या कामात राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे.

नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, संतोष आघाव, अनिल कासार, ॲड. राहुल शेटे, विलास तरवडे, मयूर चुत्तर यांनी म्हटले आहे की, व्यापारी असोसिएशनकडून नेहमीच व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. हा आमच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे, असेही आम्ही समजतो. असोसिएशनच्या अध्यक्षांकडे भाजपाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्षपद असल्याने निव्वळ कुणाच्या तरी सांगण्यावरून मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या विकासकामांना विरोध करण्यासाठी हे उद्योग सुरू आहेत.

.....

मी भाजपाचा ३० वर्षांपासून कार्यकर्ता आहे; परंतु व्यापारी संघटनेमध्ये पक्षीय राजकारण न आणता व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला आहे. शहरातील काही व्यापारी यासंदर्भात माझ्याकडे आल्यानंतर सदर निवेदन मी नगरपालिकेला दिले आहे. त्यामुळे इतर संघटनांच्या पोटात गोळा आल्याने सदर प्रकार सुरू आहे. शहरातील इतर सर्व संघटना बोगस असून, फक्त आमचीच व्यापारी असोसिएशन संघटना ही रजिस्टर्ड आहे.

-प्रकाश पारख, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन संघटना, राहुरी

.....

राहुरी शहर व्यापारी असोसिएशन संघटना ही रजिस्टर्ड नाही. दिलेले निवेदन हे केवळ एका व्यक्तीच्या दबावात येऊन प्रकाश पारख यांनी दिलेले आहे. सदर निवेदन व्यापारी असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन दिलेले नाही. पारख इतर व्यापाऱ्यांना कायम विश्वासात घेत नाहीत. यामुळे संघटनेचे अध्यक्षदेखील बदलावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

-अनिल भट्टड, व्यापारी, राहुरी

...

Web Title: A faction in the Rahuri trade association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.