निळवंडे प्रकल्पावर फडणवीस म्हणाले; हा तर माझ्या जन्मा आधीचा प्रकल्प
By शिवाजी पवार | Published: October 27, 2023 02:48 PM2023-10-27T14:48:33+5:302023-10-27T14:48:50+5:30
निळवंडे प्रकल्पावर भाष्य ; पाच दशकांची शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली
श्रीरामपूर : (अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प हा माझ्या जन्म आधी सुरू झाला.पाच दशके प्रकल्प पूर्णत्वासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागली. आता प्रकल्प पूर्ण होत कालव्यात पाणी दाखल झाले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी काकडी येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, या प्रकल्पाला २०१६-२०१७ मध्ये चालना मिळाली. त्यामुळे रखडलेले काम सुरू होऊ शकले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते. त्यासोबत अकोलेचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड या दोघांचीही साथ मिळाली. निळवंडे प्रकल्प आता पूर्णत्वास आल्याने या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३० हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. त्यामुळे जिरायती भागाला लाभ झाला आहे.