३९६ मतदान यंत्रांमध्ये बिघाड : मतदान यंत्रे बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:42 PM2019-04-23T13:42:12+5:302019-04-23T13:44:04+5:30
अहमदनगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस घेण्यात येणाऱ्या चाचणी मतदानादरम्यान (मॉक पोल) १८७ केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीस घेण्यात येणाऱ्या चाचणी मतदानादरम्यान (मॉक पोल) १८७ केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती. त्यानंतरही मतदान सुरू असताना सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली होती. आतापर्यत ३९६ मतदान यंत्रे बदलण्यात आली.
अचानक यंत्रे बंद पडल्याने निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला होता. खराब झालेली यंत्रे तातडीने बदलून देण्यात आली. अहमदनगर एम. आय.डी. सी. येथील गोदामातून ज्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये दोष निर्माण झाले आहेत, तेथे पर्यायी यंत्रे पोहोचविली जात होती.
मांडवा येथे मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदारांना १ तासाहून अधिक काळ हाल सोसावे लागले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मतदारांनी रांगांमध्येच विश्रांती घेतली. नान्नज, मुंगेचीवाडी, खर्डा येथेही २ तासांपेक्षा जास्त वेळ मतदान यंत्रे पडली होती. त्यामुळे मतदार यंत्र सुरू होण्याची वाट पहात शाळेच्या पडवीत बसले होते. अहमदनगर शहरात अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आॅस्ट्रेलियात स्थायित झालेले विजय सप्रे यांनी श्रीगोंदा शहरातील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. जामखेड शहरातील मतदान केंद्रात भर उन्हात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजीबाई आपल्या नातवासोबत आल्या होत्या.
शेवगाव शहराजवळील शोभानगर येथील मतदारांनी शीव रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मतदानावर घातलेला बहिष्कार मागे घेतल्यानंतर याठिकाणी मतदान सुरळीत सुरू झाले. राहुरी शहरातील मतदान केंद्रात दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरही व्हिल चेअरवर व रँपची सुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने ९५ वर्षीय सुंदरबाई सोनवणे या ज्येष्ठ महिलेस खरडत खरडतच मतदान यंत्रापर्यंत पोहोचावे लागले.