शेळकेच्या अटकेचा मार्ग मोकळा : शहर बँकेतील संशयास्पद कर्जप्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 07:19 PM2019-01-08T19:19:50+5:302019-01-08T19:20:20+5:30
: शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ़ निलेश शेळके याचा तीनही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला़ अर्ज फेटाळल्याने शेळके याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे़
अहमदनगर : शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ़ निलेश शेळके याचा तीनही गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला़ अर्ज फेटाळल्याने शेळके याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे़
जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली़ सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ अर्जुन पवार तर फिर्यादीच्यावतीने अॅड़ किरण जंगले, अॅड़ आनंद शिंदे व अॅड़ भीमराज काकळे यांनी युक्तिवाद केला़ पवार यांनी न्यायालयात सांगितले की, डॉ़ निलेश शेळके याने तीनही फिर्यादींच्या नावे शहर सहकारी बँकेतून हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदीसाठी कर्ज मंजूर करून घेतले़ बँकेने या कर्जाचे धनादेश डिलरच्या नावे दिले़ डिलरने हे धनादेश फिर्यादीच्या केडगाव येथील अर्बन बँकेच्या खात्यात जमा केले आणि ती रक्कम काढून अपहार केला. फिर्यादीच्या नावे केडगाव येथील बँकेतील खातेच बनावट असल्याचा फिर्यादी यांचा आरोप आहे़ त्यामुळे खाते उघडताना केलेल्या स्वाक्षरी, हस्ताक्षरांचे नमुने घेणे, रकमेबाबत सखोल तपास करून त्याची वसुली करणे यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज आहे़ फिर्यादीचे वकील अॅड़ जंगले यांनी युक्तिवाद केला की, शहर बँकेतील बोगस कर्जप्रकरण म्हणजे जनतेच्या पैशांचा अपहार असून हा गंभीर गुन्हाच आहे़ कर्जप्रकरणातील सर्व पैसे हे डॉ़ शेळके यानेच काढून घेतल्याचे दिसत आहे़ घेतलेल्या पैशांचा कुठे वापर केला हे समोर आलेले नाही़ कर्जप्रकरणातील कागदपत्रांवर शेळके याने फिर्यादीच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आहेत़ यातून आरोपीचा पैशांचा अपहार करण्याचा उद्देश समोर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिर्यादी व सरकारी पक्षाच्यावतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला़
काय आहे प्रकरण
४निलेश शेळके याने येथील शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांच्या नावे ५ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली़ याप्रकरणी वरील तीनही डॉक्टरांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून शेळके याच्यासह बँकेचे संचालक व मशिनरीचे डिलर अशा २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे़