आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारा ‘विश्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 02:54 PM2020-07-19T14:54:34+5:302020-07-19T14:55:17+5:30
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण मिळवून यशाची उत्तुंग भरारी घेतली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले हे यश आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारे ठरले आहे.
संजय सुपेकर ।
बोधेगाव : बोधेगाव (ता. शेवगाव) येथील रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण मिळवून यशाची उत्तुंग भरारी घेतली. घरच्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून त्याने मिळवलेले हे यश आई-वडिलांच्या कष्टाला हुरूप देणारे ठरले आहे.
बोधेगाव येथील रिक्षाचालक संदीप गलधर व मोलमजुरी करणाºया सुरेखा गलधर या दाम्पत्याचा मुलगा विश्वास याने बारावीला विज्ञान शाखेत ९३.३८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. हे कुटुंब मुळचे गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील आहे. रिक्षाचालक संदीप गलधर २०१२ पासून बोधेगाव ते चकलांबा फाटा या मार्गावर रिक्षातून प्रवासी वाहतूक करतात.
मोलमजुरी व रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण करणाºया या अल्पशिक्षित दाम्पत्याने मुलाच्या शिक्षणासाठी अक्षरश: जीवाचे रान केले. दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी विश्वासचे पहिली ते बारावीपर्यंतचे बहुतांश शिक्षण घरापासून दूर ठेवूनच पूर्ण केले. २०१८ ला दहावीमध्ये बोधेगावात तो ९५ टक्के गुण मिळवून प्रथम आला होता.
अभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रम घेत त्याने शेवगाव येथील न्यू आर्टस् अॅण्ड सायन्स महाविद्यालयात बारावीलाही प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशस्वी वाटचालीत त्यास प्राचार्य डॉ. पी. आर. कुंदे, उपप्राचार्य डॉ. विजयकुमार बानदार, वर्गशिक्षिका प्रा. एस. झेड. कर्नुलकर, प्रा. संगीता घोरपडे, प्रा. सुधीर काटकर, वाजिद इनामदार, अजहर पठाण, महेश मोरे, सर्जेराव तानवडे आदींचे मार्गदर्शन लाभले.
या यशामध्ये आई-वडिलांचे कष्ट व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. पुढे जेईईच्या माध्यमातून इंजिनिअरिंग करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे. तसेच यूपीएससीची तयारी करून जिल्हाधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे, विद्यार्थी विश्वास गलधर याने सांगितले.