हगणदारीमुक्त गाव योजनेचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:47+5:302021-02-14T04:19:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : शासनाने हगणदारीमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणीदेखील केली. मात्र, परराज्यातील बांधकाम कामगार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : शासनाने हगणदारीमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणीदेखील केली. मात्र, परराज्यातील बांधकाम कामगार, मजूर हे उघड्यावर शौचास जात असल्याने संगमनेर शहर व परिरसरातील काही गावांमध्ये हगणदारीमुक्त गाव या योजनेचा फज्जा उडाला आहे.
उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांमधून मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, मजूर रोजंदारीसाठी संगमनेर तालुक्यात आले आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबीयांसमवेत आले आहेत. संगमनेर तालुक्यात वर्षभर छोटी- मोठी बांधकामे सुरू असतात. बांधकामांसाठी परराज्यातील कामगार, मजुरांना मोठी मागणी असते.
सध्या शहर व परिसरातील काही गावांमध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदार हा कामगार, मजुरांना पाणी, वीज या सुविधा उपलब्ध करून देतो. त्यामुळे हे लोक बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणीच कुटुंबीयांबरोबरच कोप्यांमध्ये अथवा पत्र्यांच्या शेडमध्ये राहतात. ठेकेदार केवळ त्यांची राहण्याची व्यवस्था करतो. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शौचालयाची सोय नसल्याने पुरुष, महिला, मुले व मुली या सर्वांनाच उघड्यावर शौचाला जावे लागते, उघड्यावरच त्यांना अंघोळ करावी लागते. परिसरातील मोकळे प्लॉट अथवा नागरिकांच्या घराजवळ हे सर्व जण शौचास जातात. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढताना दिसून येते आहे. याचा रहिवाशांना त्रास होत आहे.
शौचालयाची कोणतीही सोय नसल्याने बांधकामावर काम करणाऱ्या महिला, मुलींची कुचंबणा होते, तसेच हगणदारीमुक्त झालेल्या गावांमध्ये पुन्हा एकदा हगणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हगणदारीमुक्तीसाठी केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरलेल्या दिसतात. मुक्त हगणदारीचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो, तसाच उड्यावर शौचास जाणाऱ्या बांधकामांवर काम करणाऱ्या महिला, मुलींच्या आरोग्यावरही होतो आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
-----
मोबाइल टॉयलेट ठेवावेत
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवावेत; अथवा ठेकेदाराने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय बांधून द्यावे. केवळ त्यांच्याकडून काम करून घेऊ नये, त्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
-------