बनावट नवरीला पोलिसांच्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:36 AM2018-07-04T11:36:05+5:302018-07-04T11:36:05+5:30

सिन्नर येथील युवकाला ठगविणाऱ्या बनावट नवरी व तिच्या आईला श्रीरामपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

The fake breed of the police | बनावट नवरीला पोलिसांच्या बेड्या

बनावट नवरीला पोलिसांच्या बेड्या

श्रीरामपूर : सिन्नर येथील युवकाला ठगविणाऱ्या बनावट नवरी व तिच्या आईला श्रीरामपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. संगमनेरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच या दोघींच्या मुसक्या आवळल्या. मध्यस्थ मात्र फरार झाला आहे. या टोळीने जळगावसह गुजरातमध्येही अशाच स्वरूपाचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
श्रीरामपुरातील लग्न जुळवणा-या टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला होता. सिन्नर तालुक्यातील किशोर एकनाथ पगार याला या टोळीने फसविले होते. लग्नानंतर दुस-याच दिवशी बनावट नवरी बनलेली प्रियांका व तिची आई अनिता या मध्यस्थासह पसार झाल्या होत्या. शहरातील जाकीर ऊर्फ बाळासाहेब बबन पठारे (रा. दत्तनगर), प्रियांका प्रकाश रोकडे, अनिता प्रकाश रोकडे यांच्यावर रविवारी (दि.१) याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवारी शिरसगाव परिसरातून संगमनेरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्यांना ताब्यात घेतले. मध्यस्थ जाकीरचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने पगार कुटुंबीयाला ५० हजार रुपयांना फसवले आहे. दरम्यान, राज्यात अन्य ठिकाणी या टोळीने गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जळगाव, सूरतमध्येही फसवणूक ?
पोलीस तपासात प्रियांका हिने आपल्याला जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. सुरत येथेही काही जणांना ठगवल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. प्रियांका हिनेच अन्य राज्यातील पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. त्या दिशेने तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

माहिती सांगितली खोटी
प्रियांका प्रकाश रोकडे हिने आपण अनाथ असल्याचे पगार यांना सांगितले होते. तसेच ती बहिण अनिता हिच्यासोबत राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, मंगळवारी (दि़३) पोलीस तपासात अनिता ही प्रियांकाची आई असल्याचे पुढे आले़ प्रियांका हिने तिचे नावही खोटे सांगितले होते. मात्र, रविवारी (दि़ १) त्या श्रीरामपुरात एका नातेवाईकाकडे आल्या असता तिथे तिचे खरे नाव पगारा यांना समजले आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

Web Title: The fake breed of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.