पडताळणीविना दिली दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 07:44 IST2025-01-21T07:43:48+5:302025-01-21T07:44:09+5:30
Ahilyanagar: पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

पडताळणीविना दिली दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे
- सुधीर लंके
अहिल्यानगर - पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण चर्चेत असून, आता आणखी नवा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रणालीच्या युजर आयडी व पासवर्डचा निष्काळजीपणाने वापर केला. रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीने दिव्यांगांची पडताळणी न करताच प्रमाणपत्र दिली. त्यामुळे दिव्यांगाची बनावट प्रमाणपत्र वितरित झाल्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केेलेल्या चौकशी समितीने नोंदवला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात आजवर वितरित झालेली ही प्रमाणपत्र कायदेशीर व खरी आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहिल्यानगरचे मावळते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घाेगरे यांच्या कार्यकाळात ही चौकशी झाली.
एकत्रित तपासणी नाहीच
प्रमाणपत्रासाठी विशेषज्ज्ञांच्या नावे आदेशच काढले नाहीत. दिव्यांग विभाग प्रमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिव्यांग व्यक्तीच्या पेपरची पडताळणी प्रमाणपत्र बनवावे लागते.
गोपनीय आयडी, पासवर्ड कसे झाले उघड?
‘लोकमत’ने १ ऑगस्ट २०२४ रोजी ‘जिल्हा रुग्णालयात नोंद नाही, तरीही ऑनलाईन झळकली प्रमाणपत्र’ हे वृत्त प्रकाशित करून जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. या वृत्तामुळे आरोग्य उपसंचालकांनी सहायक संचालक डॉ. योगेश चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली.
या समितीने जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब घेत अहवाल दिला. दिव्यांग प्रमाणपत्र केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारे संबंधितांना दिले जाते. या प्रणालीवर माहिती भरण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ असतो. ही गोपनीय बाब आहे.
रुग्णालय हा आयडी, पासवर्ड कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करत होते. त्यामुळे त्याचा गैरवापर होऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनली असण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष समितीने दिला आहे.