बनावट गुणपत्रिका, डिग्रीचे प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघड; अहमदनगरमध्ये एकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 06:52 AM2023-07-15T06:52:57+5:302023-07-15T06:53:14+5:30
आरोपीकडून पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे बनावट प्रमाणपत्र मिळून आले आहेत
अहमदनगर : दुसरी, चौथी, पाचवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी थेट दहावी व बारावीची गुणपत्रके, तसेच पदवीची बनावट प्रमाणपत्र ५० ते ६० हजारांना सहज मिळत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशाेक नामदेव सोनवणे (भिंगार) याला अटक केली आहे.
आरोपीकडून पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे बनावट प्रमाणपत्र मिळून आले आहेत; तसेच त्याने शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण विद्यापीठासह अन्य विद्यापीठांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याची कबुली दिली आहे. विशाल बाजीराव पारधे यांची बी.एस्सी. एम.एल.टी.चे बनावट प्रमाणपत्र देऊन अशोक साेनवणे याने फसवणूक केल्याची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांकडून तक्रारदार पारधे यांचा जबाब नोंदवून घेतला.
पोलिस ठाण्यात चौकशी सुरू असतानाच सोनवणे याला दिल्ली येथून आलेले कुरिअर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात दहावी व बारावीचे पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वेगवेगळ्या नावांची चार गुणपत्रके आढळून आली. हे कुरिअर कुणी पाठविले, याबाबत विचारणा केली असता, माझ्या ओळखीच्या दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांनी पाठविले आहेत. हे प्रमाणपत्र दिल्ली येथून तयार करून ते ५० ते ६० हजार रुपयांना विकत असल्याची कबुली आराेपीने दिली.
२०१८ पासून सुरू होती बनावट प्रमाणपत्रांची विक्री
सन २०१८ पासून अशोक सोनवणे हा बनावट प्रमाणपत्रे तयार करून विक्री करीत होता. त्याने या काळात दहावी, बारावी, विविध पदव्यांचे सुमारे तीनशेहून अधिक बनावट प्रमाणपत्रे वितरित केल्याची कबुली दिली. त्या दिशेने पोलिस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.