नगरमध्ये बनावट ताडी, हातभट्टी विक्री तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:59 PM2018-03-06T18:59:57+5:302018-03-06T19:00:56+5:30
नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तयार करतात.
अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तयार करून सर्वत्र वितरित करतात. या अवैध दारू विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
वर्षभरापूर्वी जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीमध्ये तयार झालेली बनावट दारू पिऊन पांगरमल येथील दहा जणांचा बळी गेला आहे़ या घटनेतूनही उत्पादन शुल्क विभागाने काहीच धडा घेतलेला दिसत नाही़ अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्याची मोठी जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे. या विभागातील निरिक्षकांनी मात्र ‘झिरो’ची नेमणूक करून कारवाई ऐवजी ‘उत्पादन’ची कामगिरी सुरू केली आहे. अवैध दारू विक्रीतून शहरात व परिसरात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी नेमणूक असलेल्या हद्दीत महिन्यातूनच एकदाच ‘उत्पादन’साठी फेरी मारताना दिसत आहेत.
ताडीवरील कारवाई का थंडावली
जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी स्वत: २७ डिसेंबर रोजी शहरातील कोठला व तोफखाना परिसरात बनावट ताडीच्याअड्यांवर कारवाई केली होती. या ताडीनिर्मिती संदर्भात उत्पादन शुल्क विभागाने पुढे कडक कारवाई करणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी कारवाई झाली त्याच परिसरात सध्या ताडी निर्मिती जोरात सुरू आहे़ एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी शहरातील ताडीच्या अड्यांना संरक्षण देण्याचा ठेका घेतला आहे. आता या ठेकेदारावर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानसभेत ‘तारांकित’
राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू व ताडी विक्री केद्रांवर केलेल्या कारवाईबाबत आमदार विजय औटी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. दारू, ताडीबाबत केलेली कारवाई खरी आहे का? दोषींवर काय कारवाई केली? कारवाई केली नसेल तर विलंब का होत आहे, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
शहरासह जिल्ह्यात अवैध दारू विक्री निदर्शनास आली तर तत्काळ कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही दारूविक्रीबाबत काही माहिती दिली तर कारवाई करण्यात येते़ उत्पादन शुल्क विभागाकडून नियमित तपासी मोहिम सुरू आहे.
-पराग नवलकर, अधीक्षक,उत्पादन शुल्क