अहमदनगर महापालिका आयुक्तांच्या नावे फेक व्हॉट्सॲप अकाउंट, आर्थिक फसवणुकीपासून सावधान
By अरुण वाघमोडे | Published: July 31, 2023 11:30 PM2023-07-31T23:30:47+5:302023-07-31T23:31:18+5:30
दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी तसेच परिचित व्यक्तींना व्हॉट्सॲपवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या नावे मेसेज आले.
अहमदनगर: महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेक व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून अनेकांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. या बनावट अकाउंटवरून मेसेज आला तर कुणीही आर्थिक देवान घेवान करू नये, असे आवाहन डॉ. जावळे यांनी केले आहे.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील काही अधिकारी कर्मचारी तसेच परिचित व्यक्तींना व्हॉट्सॲपवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या नावे मेसेज आले. त्या व्हॉट्सॲप अकाउंटच्या डेक्सटस्टॉप प्रोफाईलला जावळे यांचा फोटो होता. मात्र, हा नंबर जावळे यांचा नसल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. या फेक अकाउंटबाबत मनपाचे प्रसिद्धीप्रमुख शशिकांत नजान यांनी ही बाब जावळे यांच्यासह मनपातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
सदर बनावट अकाउंटवरून हिंदीतून मेसेज येतात. तसेच सुरूवातील अस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. त्यानंतर पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे अशा फसव्या मॅसेजपासून सर्तक राहून कुणीही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन आयुक्त जावळे यांनी केले आहे. दरम्यान, माझे नाव व फोटोचा वापर करून बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार केलेबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे डॉ. जावळे यांनी सांगितले.