अतिक्रमणांचा फास
By Admin | Published: May 21, 2014 11:45 PM2014-05-21T23:45:32+5:302014-05-22T00:01:35+5:30
संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे.
संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत चार वेळा अतिक्रमणे हटविण्याचा बागूलबुवा उभा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या कारवाई शुन्यतेमुळे महामार्ग धोक्याची घंटा ठरला आहे. नाशिक व पुणे या महानगरांना जोडणारा महामार्ग शहरातून जातो. महामार्गावर दुतर्फा अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरूंद झाला आहे. १३२ के.व्ही. ते प्रवरा पूल दरम्यान ३.४० किलोमीटर लांबीचा महामार्ग अधिकृत, अनधिकृत अतिक्रमणांनी व्यापला आहे. दुकानांपुढे कच्च्या-पक्या शेड उभ्या करून पथार्या पसरवून थेट रस्त्यावर व्यापार केला जातो. ग्राहकांची वाहने दुकानांसमोर लागतात. पार्र्किंगअभावी रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर उभी राहतात. महामार्गावरून नाशिक, पुणे, अहमदनगरकडे वाहतूक करणार्या दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणांमुळे ७-८ फूट रस्ता उरला आहे. बाजारपेठेमुळे दैनंदिन राबता असतो. वाहनांची रेलचेल व पादचार्यांच्या गर्दीमुळे रहदारीत अडथळे येतात. वाहतूक तासन्तास खंडित होवून वाहनांची कोंडी होते. अवजड वाहतूकीसाठी ९ किलोमीटर लांबीच्या बायपासची निर्मिती झाली. बायपासने वाहने धावू लागली खरी. पण, शहरातील वाहतुकीची समस्या मात्र तशीच राहिली. अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी संबंधीत महामार्ग उपविभाग व नगरपालिकेची आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण हटविण्याविषयी पालिका उदासिन आहे. महामार्ग उपविभाग दरवेळी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्याचा फार्स करतो. कारवाई मात्र शून्य असते. महामार्ग उपविभागातील अधिकार्यांवर राजकीय दबाव, दुकानदारांशी असलेले हितसंबंध, आर्थिक तडजोडी आदी बाबींमुळे महामार्ग अतिक्रमणांनी पूर्णत: वेढला गेला आहे. लोकसंख्येसह वाहन संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने महामार्गाचे रूंदीकरण होणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)