सरकारकडून खोटेपणाचा कळस, मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:49 AM2019-02-05T06:49:32+5:302019-02-05T06:49:41+5:30
९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : ९० टक्के मागण्या मान्य झाल्या असे सरकारचे मंत्री सांगत आहेत़ मग उपोषण सुरु ठेवायला मला काय वेड लागले आहे काय? सरकारकडून हा खोटेपणाचा कळस आहे़ मंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल होत असून ते राळेगणसिद्धीत येऊन संभ्रम निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर ताशेरे ओढले़
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही अण्णांनी सोमवारी व्यक्त केला़ उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सरकारने किती खोटं बोलावं याला काही सीमा आहे़ सरकारचे मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. अजून पाच दिवस तरी आपणाला काही होणार नाही. वजन कमी होतंय़ थोडाफार त्रास होत आहे. पण मी उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जेटली, स्वराज गप्प का?
१७ व १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल कायदा बिल लोकसभेत मांडले़ त्यावेळी भाजपचे सध्याचे मंत्री सुषमा स्वराज व अरुण जेटली लोकपाल कायद्याबाबत जे बोलत होते. ते आता सत्तेवर आल्यावर बोलायला तयार नाहीत. चूप झालेत सर्व. लोकपाल शब्दाचीच त्यांना अॅलर्जी झालीय. ज्या लोकपाल आंदोलनामुळे केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. पण आता कोट्यवधी जनतेशी ते गद्दारी करीत आहेत़