प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:00 PM2020-01-19T13:00:42+5:302020-01-19T14:27:07+5:30
रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह रविवारी सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आपत्तीे व्यवस्थापनाला यश आले आहे.
राजूर : रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह रविवारी सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील बेलपाडा जवळून येणारा हरिश्चंद्रगडाचा जो भाग आहे. त्यावरून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत हे शनिवारी रॅपलिंग करून चढत होते. त्यांच्याबरोबर ३० जणांचा ग्रुप होता.
या ग्रुपने पहिला टप्पा पार केला. ते दुस-या टप्प्यासाठी जाणार होते. यावेळी सावंत यांचा पहिल्या टप्प्याचा रॅपलिंग दोर काढत असताना तोल गेला. ते दरीत कोसळले, यानंतर इतरांनी पोलिसांनी संपर्क साधला. पोलिसांनी व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने रविवारी मृतदेह बाहेर काढला. बाकीच्या लोकांनाही सुरक्षित बाहेर काढले आहे.
अरुण सावंत यांच्यासह एकूण ३० जण हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक म्हणून सावंत यांची ओळख होती.