सत्तर देशांतील भाविक होतात साईचरणी लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:39 AM2019-11-10T03:39:13+5:302019-11-10T03:39:17+5:30
‘चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी माझ्या माणसांना साता-समुद्रापलीकडून ओढून आणीन’ हे साईबाबांनी वर्तवलेलं वाक्य तंतोतंत खरे ठरले़
प्रमोद आहेर
शिर्डी : ‘चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी माझ्या माणसांना साता-समुद्रापलीकडून ओढून आणीन’ हे साईबाबांनी वर्तवलेलं वाक्य तंतोतंत खरे ठरले़ सध्या भारतासह ७० देशांतील भाविक शिर्डीतील साईदरबारी हजेरी लावत असून, जगभरात पाचशेहून अधिक मंदिरे व शेकडो प्रार्थना केंद्रे आहेत़
लंडनमध्ये २३ जुलै १९६५ रोजी गोल्डर्स ग्रीन भागात बनारसे आजींनी आपल्या घरातील खोलीचे साईमंदिरात रुपांतर करून विदेशात पहिल्यांदा श्रीसाईबाबा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली़ विदेशात मंदिर बांधणीचे नियम कडक असूनही लंडन शहरात चार मोठी मंदिरे व अनेक प्रार्थना केंद्रे आहेत, असे लंडन येथील साईभक्त प्रतिक कोठारी यांनी सांगितले़ अमेरिकेत ७५ पेक्षा अधिक मंदिरे असून मेनियापुली येथे ४२ एकरात साईमंदिर उभारले जात आहे़ न्यूझीलंडमधील आॅकलंड शहरात भास्कर रेड्डी यांनी २५ कोटी कर्ज घेऊन ७ वर्षांपूर्वी बांधलेले साईमंदिर आता कर्जमुक्त झाले आहे़ तीन पिढ्यांपूर्वी मलेशियाला गेलेल्या कन्नन यांची मलेशियात २६ योगाकेंद्रे आहेत़ तेथे साईबाबांची प्रतिमापूजन व मराठीतील आरतीने दिवसाची सुरूवात होते़ गेल्या वर्षी जगभरातील मंदिरांनी साईसमाधी शताब्दी साजरी केली़ साईसंस्थानच्या मंदिर परिषदेला ४० विदेशी मंदिर प्रतिनिधींनी हजेरी लावल्याचे संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी सांगितले़
वर्षभरात शिर्डीला सोळा हजारांहून अधिक विदेशी व अनिवासी भारतीयांनी भेट दिली़ संस्थानला वर्षाकाठी सुमारे १८ कोटी रूपयांचे तसेच ७० देशांचे विदेशी चलन देणगीतून मिळते, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी सांगितले़