जामखेड नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 09:20 AM2019-04-14T09:20:21+5:302019-04-14T09:21:02+5:30
जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण आठ दिवसापासून आजारी होत्या.
जामखेड - जामखेड नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदाखान असिफखान पठाण (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये रविवार दि. १४ रोजी पहाटे चार वाजता उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व दोन मुली नातवंडे असा आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण आठ दिवसापासून आजारी होत्या. त्या विखे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. परंतु उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे तीन दिवसापूर्वी त्यांना पुणे येथील रूबी हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल केले होते. आज रविवार सकाळी पहाटे चारच्या सुमारास उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत फरिदा असिफखान पठाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग १५ मधून निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी तात्विक मतभेद झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये सहभागी झाले होते. पालकमंत्री राम शिंदे यांनी आठ महिन्यांपूर्वी त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली होती. आठ महिन्यांच्या काळात नगरपरिषदेच्या वतीने शहरात चालू असलेल्या विविध विकास कामांसाठी त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे पती असिफखान पठाण जामखेड ग्रामपंचायतचे पाच वर्षे उपसरपंच होते. त्यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते.
दरम्यान, आज सायंकाळी चारच्या सुमारास उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण यांचा अंत्यविधी शहरातील कब्रस्थानमध्ये केला जाणार आहे.