बळीराजाची १४ लाख रुपयांची फसवणूक, दोन व्यापाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 04:10 PM2022-03-05T16:10:59+5:302022-03-05T16:11:55+5:30
अमोल ज्ञानेश्वर फुटाणे (रा. वरुड, जि. अमरावती) व मायनूल इस्लाम करीम इस्लाम (रा. नाँर्थ परगाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अहमदनगर : विकत घेतलेल्या संत्र्यांचे पैसे बँक खात्यात जमा करतो, असे सांगून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची १४ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमोल ज्ञानेश्वर फुटाणे (रा. वरुड, जि. अमरावती) व मायनूल इस्लाम करीम इस्लाम (रा. नाँर्थ परगाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वाळकी येथील संत्रा उत्पादक शेतकरी संदीप मधुकर तावरे यांनी पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्यांना संत्री विकली. १४ लाख ५० हजार रुपयांचा त्यांचा व्यवहार ठरला. त्यानंतर व्यापारी संत्रा ट्रक घेऊन आले. त्यांनी शेतातील संत्रा तोडून तो त्यांनी ट्रकमध्ये भरला. संत्रा ट्रक भरून झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी १५ लाख ५० हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आरटीजीएस केले; परंतु संत्र्याच्या ट्रक महाराष्ट्राबाहेर पडल्याने शेतकऱ्याचे बँक खाते व्यापाऱ्यांनी होल्ड केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी संदीप तावरे यांनी पोलीस स्टेशन गाठले. नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
.....
शेतकऱ्याला १४ लाख केले परत
नगर तालुका पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये वसूल केले असून, ही रक्कम पोलिसांनी शेतकरी संदीप तावरे यांना परत केली.