झटपट येणाऱ्या सोयाबीनमुळे शेतकरी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:59+5:302021-09-16T04:27:59+5:30
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली. मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर ...
अहमदनगर : गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली. मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे, उशिरा येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला अथवा जास्त झाला तरी, शेतकरी मालामाल होत आहे. त्यातच यंदा भावही चांगल्या प्रकारे मिळत आहे.
यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस पडला. त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. यंदा शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी या पिकांच्या तुलनेत सोयाबीनला प्राधान्य दिले.
-----
सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये...
वर्ष पेरा
२०१७ ७५१७४
२०१८ ८९८४४
२०१९ ५२२८२
२०२० ५४२९४
२०२१ ९९४१७
-----
झटपट येणारे सोयाबीन...
जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात सोयाबीनच्या लागवडीस प्रारंभ होतो. झटपट येणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाची लागवड केल्यानंतर तीन महिन्यात हे पीक काढण्याच्या स्थितीत येते. त्यामुळे सुरुवातीला व मध्ये केव्हाही पाऊस झाला तरी, या पिकाला फायदाच होतो.
---
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन...
मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीनची लागवडही जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होते. लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोयाबीन काढणीस येते. यंदा पाऊस लांबल्याने पिकाच्या उत्पादनात मात्र घट होणार आहे. मात्र भाव चांगला मिळाल्यास दिलासा मिळेल.
-----
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन...
या सोयाबीनचा कालावधी पूर्ण चार महिन्यांचा असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास त्याची काढणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यात होते. जास्त कालावधीच्या सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी या पिकाला टाळत असल्याचे दिसते.
----
सोयाबीन हे पीक अल्प पावसातही तग धरून राहते. त्यामुळे आम्ही याच पिकाला प्राधान्य देतो. तसेच गेल्या दोन हंगामापासून पिकाला भावही चांगला मिळतो आहे. यंदाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनपासून चांगले पैसे मिळतील.
- रोहिदास शिंदे,
शेतकरी
-----
गेल्या पाच वर्षांपासून सोयाबीनची लागवड करतोय. सुरुवातीची काही वर्षे अपेक्षित भाव मिळाला नाही. मात्र आता सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. यंदा हवामानाच्या बदलामुळे उत्पादनात घट होईल. मात्र चांगला भाव असल्यामुळे पैसेही चांगले मिळतील. त्यामुळे इतर पिकांपेक्षा हे पीक परवडेल.
- भाऊ जाधव,
शेतकरी